जाहीरनामा प्रसिद्धीसाठी पक्ष सज्ज
By Admin | Updated: October 17, 2015 00:20 IST2015-10-17T00:16:12+5:302015-10-17T00:20:16+5:30
‘राष्ट्रवादी’पासून सुरुवात : काँग्रेस, शिवसेना साधणार पुढील आठवड्यातील मुहूर्त

जाहीरनामा प्रसिद्धीसाठी पक्ष सज्ज
कोल्हापूर : जाहीरनामा हा निवडणुकीतील प्रचारात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पक्ष, आघाड्या शहर विकासाच्यादृष्टीने आपली भूमिका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. असा जाहीरनामा प्रसिद्धीसाठी पक्ष, आघाड्या सज्ज झाल्या आहेत. जाहीरनामा प्रसिद्धीची सुरुवात राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी उद्या, रविवारपासून करणार आहे. याच दिवशी भाजप-ताराराणीनेही जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस विजयादशमीचा मुहूर्त साधणार असून, शिवसेना २५ आॅक्टोबरला प्रसिद्ध करणार आहे.
सर्व्हे, मतदार, तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांशी चर्चा, अशा विविध आणि आपआपल्या पद्धतीने निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे तयार केले आहेत. अर्ज भरणे, छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता संबंधित पक्ष, आघाड्यांकडून जाहीरनामा प्रसिद्धीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यात राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा चौक येथून माजी मंत्री जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार प्रारंभ करणार आहे. याचवेळी जाहीरनामा प्रसिद्धी आणि आघाडीच्या ८१ उमेदवारांची ओळख करून दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. ‘कोल्हापूर संवाद’च्या माध्यमातून शहरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांशी चर्चा करून काँग्रेसने जाहीरनामा तयार केला आहे. त्याची प्रसिद्धी विजयादशमीच्या मुहूर्तावर २२ आॅक्टोबरला केली जाणार असल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा २५ आॅक्टोबरला रोड-शो होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. भाजप-ताराराणी आघाडीचा जाहीरनामा तयार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आज, शनिवारी चर्चा करून २० अथवा २१ आॅकटोबरला जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येईल, असे आघाडीचे निमंत्रक सुनील मोदी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ताराराणी आघाडीचा ‘कपबशी’साठी आग्रह
महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात ताराराणी आघाडीने ३८ उमेदवार उतरविले आहेत. विविध प्रभागांतून लढण्याची तयारी करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी ‘कपबशी’ चिन्हासाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार त्यांनी ‘कपबशी’ चिन्हाची विभागीय निवडणूक कार्यालयात मागणी केली आहे.