भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

By admin | Published: April 23, 2016 01:31 AM2016-04-23T01:31:45+5:302016-04-23T01:44:48+5:30

चंद्रकांतदादा पाटील : व्हनाळी येथे अन्नपूर्णा पाणी योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ

Prepare a list of prisoners for corruption | भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

Next

म्हाकवे : आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. पूर्वी या जन्मात केलेले अपकृत्य पुढच्या जन्मात फेडायला येत होते. परंतु या जन्मात केलेले अपकृत्य याच जन्मात फेडायला लागत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ हे आहे. सहकारामध्ये भ्रष्टाचार केलेल्यांची यादी तयार असून कोणी कधी
तुरुंगात जाणार याची ही तारीख ठरलेली
आहे, असा गौप्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
व्हनाळी (ता. कागल) येथील अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरण प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात कागलसह जिल्ह्यात अनेक बोगस निराधार लाभार्थी घुसडण्यात आले. त्याची छाननी करून त्यांना कमी करताना आमच्या घरावर मोर्चे काढण्यात आले, परंतु मी घाबरणारा मंत्री नाही. कारण आम्ही कुठल्याही सामान्य माणसाची फसगत न करता या यादीतून धनदांडग्यांनाच वगळले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संजय घाटगेंसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीलाही मुबलक पाणी मिळत आहे.
प्रास्ताविक दत्ताजीराव घाटगे यांनी केले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, आदींची भाषणे झाली.
संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार, आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)



सहकारमंत्र्यांच्या घरात गडी राहतो
चंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांचे सर्व घोटाळे बाहेर काढले तर दादांचे जोडेही उचलण्यासाठी तयार आहोत. साखर कारखान्यात १० टनांची ८ टन पावती देऊन शेतकऱ्यांची लूट सुरूआहे. १० टन उसाबरोबर १० टनाची पावती घोरपडे कारखान्यातून मिळाली तर सहकारमंत्र्यांच्या घरात मी गडी राहतो, असे आवाहनही माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे यांनी केले.
आता ऊस गाळपाचा विचार करू
संजय घाटगे यांनी ‘अन्नपृूर्णा’च्या माध्यमातून ओसाड डोंगरमाथ्यावर एक लाख टन ऊस निर्माण केला आहे. आता हा तयार होणारा ऊस याच ठिकाणी गाळप होण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आवश्यकता पडली तर सहकार कायद्यात बदल करु पण घाटगे यांना ऊस गाळप परवाना मिळवून देऊ, असा शब्दही पाटील यांनी दिला.

Web Title: Prepare a list of prisoners for corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.