पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे सज्ज

By Admin | Updated: December 23, 2014 23:48 IST2014-12-23T21:12:47+5:302014-12-23T23:48:31+5:30

आजरा तालुका : ‘गजरगाव’ वगळता पाटबंधारेच्या सर्व बंधाऱ्यांची डागडुजी पूर्ण

Prepare for irrigation to save water | पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे सज्ज

पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे सज्ज

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आजरा तालुक्यातील ‘गजरगाव’ वगळता सर्वच बंधाऱ्यांची डागडुजी पूर्ण झाली असून, उन्हाळ्यातील पिकांसह बागायत पिके व अनेक गावच्या पाणी योजनांना पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग सज्ज झाला आहे.
उचंगी प्रकल्पांतर्गत तारओहोळ नाल्यावर असणारे हांदेवाडी, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, किणे, शिरसंगी, वाटंगी क्र. ७, ८, यमेकोंड क्रमांक ५, ६ व श्रृंगारवाडी हे दहा बंधारे जानेवारीअखेर उपलब्ध असतात. प्राधान्याने शेतीपिकांकरिता या पाण्याचा वापर होतो.
बारमाही पाणीसाठा करणाऱ्या ऐनापूर, भादवण, चांदेवाडी, हाजगोळी बंधाऱ्यांपैकी ऐनापूर बंधाऱ्याची ४५ लाख रुपये, तर भादवण बंधाऱ्याची ५४ लाख रुपये खर्चून गतवर्षी दुरुस्ती करण्यात आली आहे. हाजगोळी बंधाऱ्याची ५० टक्के दुरुस्ती पूर्ण झाली आहे, तर ५० टक्के शिल्लक आहे.
देवर्डे साळगाव व दाभिल बंधाऱ्यांचे पाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत उपलब्ध होते. १३व्या वित्त आयोगांतर्गत दाभिल बंधाऱ्याच्या पिल्लरच्या दुरुस्तीवर ४२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीस खानापूर, धनगरवाडी, चित्री, यरंडोळ हे तलावही पूर्णक्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पाटबंधारेच्या अखत्यारितील धरणे व तलावांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना कोणताही धोका पाण्याअभावी होणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंधारे व तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठा असल्याने या पाणीसाठ्यावर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग सुखावला आहे.


वसुलीत पाटबंधारे विभाग आघाडीवर
आजरा तालुक्यात बिगर सिंचन व सिंचन वसुलीत पाटबंधारे विभाग आघाडीवर आहे. ८५ टक्के वसुली आजतागायत पूर्ण झाली असून, कर्मचारी वर्गाचा पगार, बंधाऱ्यामध्ये बरगे घालणे-काढणे, आदींचा खर्च बाजूला केला तरीही पाटबंधारे विभाग फायद्यातच आहे.


गजरगावला ‘ठेकेदार’ मिळेना
गजरगाव बंधाऱ्याचे पिलर बाद झाले असून, बंधाऱ्याला गळती लागली आहे.
दुरुस्तीसंदर्भात ४५ लाख रुपयांचे तीनवेळा टेंडर काढण्यात आले.
मात्र, इतर बांधकामापेक्षा हे दर परवडणारे नसल्याने कोणीही ठेकेदार ‘टेंडर’ घेण्यास इच्छुक नसल्याचे पाटबंधारेचे शाखा अभियंता आर. ए. हारदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Prepare for irrigation to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.