उद्याच्या गौरी-गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण; महापालिका प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:44+5:302021-09-13T04:23:44+5:30
कोल्हापूर : मंगळवारी होत असलेल्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी गर्दी ...

उद्याच्या गौरी-गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण; महापालिका प्रशासन सज्ज
कोल्हापूर : मंगळवारी होत असलेल्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून शहराच्या विविध भागांत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेमार्फत १६० कृत्रिम विसर्जन कुंडे ठेवण्यात येणार आहेत.
कोराेना संसर्गाच्या काळात विसर्जनावेळी गर्दी टाळण्याचे तसेच कृत्रिम कुंडांतून मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून नियोजित वाहनामधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
घरगुती गौरी-गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे २०० कर्मचारी विसर्जन कार्यात मदत करणार आहेत. विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांत विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती नेण्यासाठी प्रत्येकी दोन माथाडी कामगारांसह ९० ट्रॅक्टर, टेम्पो व चार जे.सी.बी. यंत्रे अशी यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामग्रीसह तैनात करण्यात येणार आहेत.
विद्युत विभागाकडून इराणी खण येथील विसर्जन ठिकाणी विजेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली. खणीभोवती लक्कडकोट बांधण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने विसर्जन ठिकाणांची तातडीने साफसफाई केली जाणार असून त्यासाठी ३०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. नागरिकांनी अर्पण केलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने १२ पथके तयार करण्यात आली आहेत. निर्माल्याचे विलगीकरण करून खतनिर्मितीसाठी पाठविले जाणार आहे.