ग्रामपंचायत सत्तेची तयारी सुरू

By Admin | Updated: January 21, 2015 23:59 IST2015-01-21T23:20:18+5:302015-01-21T23:59:01+5:30

हातकंणगले तालुका : मतदार यादी बनविण्याचे काम सुरू

Preparations for Gram Panchayat power | ग्रामपंचायत सत्तेची तयारी सुरू

ग्रामपंचायत सत्तेची तयारी सुरू

आयुब मुल्ला - खोची -हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी गावपातळीवर इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. शासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने गतिमान झाली आहे. मतदारसंख्या वाढल्याने सदस्य संख्येबरोबर प्रभागातही वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय संदर्भ बदलल्याने पक्षापेक्षा आघाड्यांचीच बांधणी करून निवडणुका लढविल्या जातील, असे चित्र आहे. इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे, तर आरक्षित जागांसाठी कागदपत्रे गोळा करून दाखले काढण्याची लगबग सुरू आहे.
हातकणंगले तालुक्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार २५ गावांत १ लाखांत ४६ हजार ७५६ इतकी मतदारसंख्या झाली आहे. यातून ९४ प्रभागांची रचना होऊन २६१ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी २१ ग्रामपंचायतींकरिता जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कारण यांची मुदतच आॅगस्टमध्ये संपते. त्यामुळे यापूर्वीच निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्याचा विचार करता कार्यकर्त्यांबरोबरच शासकीय यंत्रणाही आपल्या दृष्टीने आवश्यक त्या जोडण्या लावण्यात मग्न झाली आहे.
मतदारयादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. ती २८ जानेवारीला प्रसिद्ध करावयाची आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती नोंदवायच्या आहेत. दरम्यान, २८ जानेवारीनंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत होणार आहे. त्यावेळी काही त्रुटी आढळल्यास किंवा वाटल्यास ग्रामस्थांनी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडता येणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने इच्छुकांना आपली प्रचाराची यंत्रणा सर्वार्थाने गतिमान करता येणार आहे. पॅनेल बांधणीची रचनात्मक सुरुवात प्रमुख नेते मंडळींना करणे सोपे होणार आहे.

Web Title: Preparations for Gram Panchayat power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.