कन्यागत सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: July 10, 2016 01:41 IST2016-07-10T01:17:00+5:302016-07-10T01:41:29+5:30
विकासकामे पूर्णत्वाकडे : पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी खर्च; कामाची लोकप्रतिनिधींकडून पाहणी विकासकामे पूर्णत्वाकडे : पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी खर्च; कामाची लोकप्रतिनिधींकडून पाहणी

कन्यागत सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १२ आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली असून घाटांची उभारणी, घाटावरील विद्युतीकरण, रस्ते, पार्किंग, आदी सर्व पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ६५ कोटींपैकी ६२ कोटींचा निधी विविध विकासकामांवर खर्च झाला आहे.
कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांबाबत पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आमदार उल्हास पाटील, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजी जगदाळे, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, माजी सरपंच अभिजित जगदाळे यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, देवस्थान समितीचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा येत्या १२ आॅगस्टपासून भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांनी सक्रिय योगदान दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व विकासकामांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार सर्व यंत्रणांना सक्रिय केले आहे.
आमदार उल्हास पाटील म्हणाले, कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यामध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन त्या-त्या उपाययोजना गतिमान केल्या आहेत. या सोहळ्यानिमित्त करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक गतिमान करण्यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शासनाच्या निधीतून होणारी सर्व विकासकामे अतिशय दर्जेदार आणि आकर्षक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी देवस्थान समितीचे सचिव संजय पुजारी म्हणाले, १२ आॅगस्ट २०१६ पासून सप्टेंबर २०१७ या कालावधीत कन्यागत महापर्वकाळ सोहळा साजरा होत असून, वर्षभर पर्वण्या सुरू राहणार असून भाविकांना या पर्वणीकालामध्ये पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल.
तहसीलदार सचिन गिरी यांनी, नृसिंहवाडी येथील घाटावर एकाच वेळी ५० हजार भाविकांना स्नान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या स्नानाची, राहण्याची, दर्शन मंडप, पार्किंगची, पिण्याचे पाणी, घाटांवर विद्युतीकरण, रस्ते, शौचालय अशा सर्व सुविधा प्राधान्यक्रमाने उभारण्यात येत असल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सोहळ््यात अष्टतीर्थाला महत्त्व
कन्यागत महापर्वकाळ हा दर १२ वर्षांनी संपन्न होतो. कन्या राशीमध्ये गुरू ग्रहाचे वास्तव्य १३ महिने असते. या काळामध्ये गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला येते व पर्वकाल संपन्न होईपर्यंत कृष्णा नदीच्या सहवासात वास्तव्य करते, अशी महती आहे.
कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमाकाठी वसलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे कृष्णा तीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशीतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ, शक्तितीर्थ व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे आहेत.
कन्यागत महापर्वकाळात अष्टतीर्थ स्नानास अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. कन्यागत सोहळ्याचे मुख्य स्थान हे अष्टतीर्थांपैकी एक असे शुक्लतीर्थ आहे, असे संजय पुजारी यांनी सांगितले.
१२१ कोटींचा निधी मंजूर
राज्य शासनातर्फे कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी १२१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या सोहळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी ६५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नृसिंहवाडी येथील विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. ही कामे अतिशय दर्जेदार आणि आकर्षक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे, असे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.
शुक्लतीर्थावर होणार ‘श्रीं’च्या मूर्तीचे स्नान
कन्यागत महापर्वकाळाच्या सोहळ्यामध्ये श्रींच्या उत्सवमूर्र्तीचे १२ आॅगस्ट रोजी सूर्योदयाला शुक्लतीर्थ येथे स्नान झाल्यानंतर कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास प्रारंभ होतो. त्यामुळे १०४ मीटरच्या शुक्लतीर्थ घाटाची आकर्षक आणि दर्जेदार बांधणी केली असून, या ठिकाणी मोठा घाट तयार करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.