ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:42+5:302021-05-05T04:39:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शासनाच्यावतीने ऑक्सिजन प्लॅन्ट ...

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शासनाच्यावतीने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची जोरदार तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी नवा आशेचा किरण दिसू लागला आहे. तातडीने ऑक्सिजन प्लॅन्ट शासनाने उभारावा, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
शाहूवाडी तालुक्यात जानेवारी महिन्यापासून तालुक्यातील ८६ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या रुग्णांना उपचारासाठी करंजोशी येथील अल्फोन्सा स्कूल, पेरीड येथील डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय व मुलींचे वसतिगृह , तुरुकवाडी येथील श्री दत्त सेवा विद्यालय या ठिकाणी कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. दररोज या कोरोनाबाधित रुग्णांना चाळीस ते पन्नास ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. ही सिलिंडर आरोग्य विभाग गोकुळ शिरगाव येथून आणत आहेत. ती सिलिंडर कमी पडत आहेत. दररोज तीस ते चाळीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. कोविड सेंटर, खासगी रुग्णालय येथे सध्या ४७९ रुग्ण उपचार घेत आहेत. ३३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने सर्व कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने नवीन एक किलोमीटरची विद्युत लाईन टाकण्याची तयारी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी, आरोग्य विभाग यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्रव्यवहार सुरू केला आहे. महावितरण कंपनीला चोवीस तास वीज पुरवठा होईल, वीज खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचा आदेश दिला आहे.
ऑक्सिजन प्लॅन्टसाठी चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यासाठी मेन लाईनवर असणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.