प्रणयची आत्महत्या ब्लॅकमेलिंगमधूनच

By Admin | Updated: November 14, 2014 00:14 IST2014-11-14T00:12:56+5:302014-11-14T00:14:16+5:30

गूढ उलगडले : सावंतवाडीतील युवकाला अटक

Premani's suicide comes from Blackmail | प्रणयची आत्महत्या ब्लॅकमेलिंगमधूनच

प्रणयची आत्महत्या ब्लॅकमेलिंगमधूनच

सावंतवाडी : मळगाव आजगावकरवाडीतील प्रणय आजगावकर याच्या आत्महत्येचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही आत्महत्या एकतर्फी प्रेमातून प्रियकराला सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या उद्देशातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वरुण विजय वाडकर (वय २८, रा. जुनाबाजार, सावंतवाडी ) याला अटक केली आहे. मात्र, प्रणयला धमकी देणारा वरूणाचा मित्र अजून खुलेआम फिरत असल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मळगाव आजगावकरवाडीतील प्रणय श्रीधर आजगावकर याने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बुधवारी पोलिसांनी प्रणयचे प्रेम असलेल्या मुलीची चौकशी करत तिचा जबाब नोंदवला. त्यातच आत्महत्येनंतर वरूण हा मुंबईला पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांसमोरच्या अडचणी आणखी वाढत जात होत्या. तर दुसरीकडे प्रणयच्या नातेवाईकांनीही वरूण याला लवकर अटक करा, अशी मागणी केली होती.
पोलिसांनी प्रणय याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरूण वाडकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वरूण हा विवाहित असून त्याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला आहे. सकाळी जेव्हा पोलीस वरूणच्या घरी गेले तेव्हा वरूण याच्यासह त्याची पत्नी घरी एकटीच होती. तिला वरूणचा हा प्रकार कळल्यानंतर अश्रू आवरणे कठीण झाले होते.
प्रणयच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरूण वाडकरला ताब्यात घेतले आहे. मात्र, प्रणयला प्रत्यक्ष घरी जात धमकी देणारा कोण? याचाही शोध घ्या आणि त्याला तातडीने अटक करा, अशी मागणी मळगाव ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच या गुन्ह्यात मोठी कार वापरण्यात आली आहे. ती कार कोणाची आहे, याचाही शोध घेण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी न्याय दिला, असे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.
मित्राला पाठवून मारण्याची धमकी
प्रणयला भेटत असल्याने वरूण हा चिडायचा. एके दिवशी वरूणने आपल्या मित्राला पाठवून प्रणयला धमकी दिली होती. पुन्हा मला भेटू नको, असे सांगितले होते. तसेच पंधरा दिवसांपूर्वी वरूणने स्वत:च्या मोबाईलवरूनही प्रणयला फोन केला व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याबाबत प्रणयने मला सांगितले होते. त्यावरून याचा जाब वरूणला विचारला होता, असेही प्रणयच्या प्रेयसीने पोलिसांना सांगितले.
आत्महत्येपूर्वी प्रणयने व्यक्त केली भेटण्याची इच्छा
मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रणयने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दुपारी परीक्षा असल्याने मी त्याला भेटायला गेली नाही. सोमवारी सायंकाळीही त्याने मला फोन केला होता. त्यावेळीही प्रणय हा वरूणबद्दलच बोलला. तसेच तो शिव्या घालत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Premani's suicide comes from Blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.