गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:16+5:302021-07-07T04:31:16+5:30
कोल्हापूर : गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या अनुषंगाने अमेरिकेसह काही प्रगत राष्ट्रांत झालेल्या संशोधनानंतर आता गरोदर महिलांना कोरोना ...

गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस
कोल्हापूर : गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या अनुषंगाने अमेरिकेसह काही प्रगत राष्ट्रांत झालेल्या संशोधनानंतर आता गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे अधिक सुरक्षित, तसेच फायदेशी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही लवकरच गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असून त्याचे नियोजन केले जात आहे.
कोरोनापासून बचाव करण्याकरिता लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा लसीकरणाचे वयोगटानुसार गट तयार केले होते. अठरा वर्षांच्या आतील तसेच गरोदर महिलांना लस देण्याचा निर्णय झालेला नव्हता. परंतु देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला असताना आणि सर्वच वयोगटातील नागरिकांना त्याचा धोका वाढला असताना प्राधान्याने गरोदर महिलांना लस द्यायची की नाही, यावर विचारविनिमय झाला नव्हता. परंतु अलीकडेच अमेरिकेसह काही राष्ट्रांत गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे किती सुरक्षित आहे, लस दिल्यास काही दुष्परिणाम होतील का? यावर संशोधन झाले.
संशोधनाअंती कोरोना प्रतिबंधात्मक लस गरोदर महिलांना देणे अधिक सुरक्षित तसेच फायदेशीर असल्याची बाब समोर आली. एखाद्या गरोदर महिलेला कोरोना झाला आणि दुर्दैवाने तिची प्रकृती गंभीर बनली तर, उपचारासाठी धावाधाव करावी लागणार आहे. कोराेनावरील उपचारही भयानक व खर्चीक आहेत. रोगाचे तसेच मृत्यूचे भय घेऊन वावरण्यापेक्षा लस घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण -१३ लाख ६८ हजार ६९०
पुरुष -६ लाख ९१ हजार २८२
महिला - ६ लाख ७७ हजार १५१
एकूण लसीकरण - २९ टक्के
कोट -
गरोदर महिलांना लसीकरण करण्यासंदर्भात अजून राज्य सरकारकडून आदेश अथवा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मंगळवारी व्हीसी झाली. त्यामध्ये हा विषय चर्चेला आला होता. आम्हाला नियोजन करा अशा सूचना या वेळी दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात गरोदर महिलांच्या लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.
डॉ. फारुक देसाई, जिल्हा लसीकरण अधिकारी
कोट -
गरोदर महिलांना कोरोना झाला तर त्यावरील भयंकर उपचार घेण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अधिक चांगले आहे. गरोदर महिलांनी लस घेतल्यानंतर कोणतेही परिणाम होत नाहीत, उलट माता व बाळासाठी ती अधिक सुरक्षित तसेच फायदेशीर असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर मुलासाठी संधी घेणाऱ्या तसेच वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या महिलाही आता लस घेऊ शकतात.
डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोगतज्ज्ञ