गर्भवतीची आत्महत्या
By Admin | Updated: September 27, 2015 00:27 IST2015-09-27T00:22:27+5:302015-09-27T00:27:44+5:30
वर्षापूर्वी विवाह : मुक्त सैनिक वसाहतीतील घटना

गर्भवतीची आत्महत्या
कोल्हापूर : इचलकरंजी येथील नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेने आपल्या येथील मुक्त सैनिक वसाहतीमधील माहेरी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. अवघ्या वर्षापूर्वी विवाह झालेल्या या महिलेचे नाव जयश्री गजानन बागेवाडी (वय २३) असे आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इचलकरंजी येथील जयश्री बागेवाडी हिचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. ती नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने गेल्याच महिन्यात बाळंतपणासाठी आपल्या कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत येथील माहेरी राहण्यास आली होती. तिच्या पतीचा इचलकरंजी येथे हातमाग कारखाना आहे. ती माहेरीच असताना शनिवारी सकाळी तिच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या पतीला बोलावून घेण्यात आले. त्यानुसार पती कोल्हापुरात आल्यानंतर ती पतीसह खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करून आली. पती दुपारी इचलकरंजीला गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जयश्री बागेवाडी हिने माहेरी घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यावेळी घरातील स्वच्छतागृहात ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सीपीआर पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)