कोल्हापुरात माॅन्सूनपूर्व पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:39+5:302021-06-06T04:17:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी माॅन्सूनपूर्व पावसाची रिपरिप राहिली. दिवसभर ढगाळसह पावसाळी वातावरण राहिले. या पावसामुळे ...

Pre-monsoon rains in Kolhapur | कोल्हापुरात माॅन्सूनपूर्व पावसाची रिपरिप

कोल्हापुरात माॅन्सूनपूर्व पावसाची रिपरिप

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी माॅन्सूनपूर्व पावसाची रिपरिप राहिली. दिवसभर ढगाळसह पावसाळी वातावरण राहिले. या पावसामुळे खरीप पेरणीसह पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

दोन दिवसांपूर्वी माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणात काहीसा बदल झाला आहे. ढगाळ वातावरणासह अधून-मधून पावसाची रिपरिप सुरू आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्गे महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होणार आहे. माॅन्सूनचा वेग पाहता येत्या चार-पाच दिवसांत तो महाराष्ट्रात सक्रिय होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रात्रभर पावसाची भुरभुर सुरू असली तरी शनिवारी सकाळी मात्र आकाश मोकळे झाले होते. सूर्यनारायणाने दर्शन दिले. त्यानंतर काही काळ ऊन राहिले, मात्र दुपारी एकनंतर आकाशात ढगांची दाटी वाढू लागली. अडीच वाजता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली. पावसाला जोर नसला तरी एक सारकी रिपरिप सुरू राहिली. एकूणच पावसाळी वातावरण राहिल्याने माॅन्सूनची चाहूल लागल्याचे दिसले.

कोणत्याही क्षणी माॅन्सून सक्रिय होऊ शकतो, असे वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्याची लगबग वाढली आहे. भात, सोयाबीन, भुईमूगसह इतर पेरणीसाठी एकच धांदल उडाली आहे. सकाळी सातपासूनच शिवार फुललेली दिसतात. येत्या चार-पाच दिवसांत पेरण्यांना आणखी गती येणार आहे.

मंगळवारी ‘मृग’ नक्षत्र

मंगळवारी (दि. ८) सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सूर्य ‘मृग’ नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्राला ‘गाढव’ वाहन असून या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Web Title: Pre-monsoon rains in Kolhapur