प्रयाग चिखलीच्या तरुणाचा मानोली धबधब्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: August 18, 2015 01:01 IST2015-08-18T01:01:31+5:302015-08-18T01:01:31+5:30
दगडाच्या फटीत अडकून ठार

प्रयाग चिखलीच्या तरुणाचा मानोली धबधब्यात बुडून मृत्यू
आंबा : मानोली धबधब्याच्या डोहात पोहताना इम्रान दस्तगीर अत्तार (वय २७, रा. शाहूवाले मळा, प्रयाग चिखली) हा दगडाच्या फटीत अडकून ठार झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेने धरण व धबधबा परिसर सुना झाला. आस्कमिक घडलेल्या या अपघातामुळे सोबतचे पाच मित्र भांबावून गेले. धबधब्याच्या गर्दीत इम्रान दिसेनासा होताच त्यांनी मदतीची हाक दिली. मानोलीच्या तरुणांनी पाईपच्या साहायाने शोध घेऊन अर्ध्या तासात मृतदेह डोहाबाहेर काढला व मित्रांनी शाहूवाडी पोलिसांत धाव घेतली.
याबाबतची अधिक माहिती अशी, अत्तार ओमनी मारुतीने सकाळी गल्लीतील पाच मित्रांसोबत पावनखिंडमार्गे विशाळगडला देव दर्शनास गेले होते.
तेथे प्रसाद घेऊन आंबामार्गे परतताना मानोली धरणाजवळच्या धबधब्यात अंघोळीस उतरले. अंघोळ करून जेवायचे, असे ठरवून इम्रान धबधब्याखाली गेला. डोहात सूळ मारताच डोहाच्या दगडात डोके अडकून बुडून तो ठार झाला. धबधब्याखाली वीस फुटांवर डोह आहे. वरून डोह वीस फूट घेराचा असला, तरी पाण्यात निमुळता घेर आहे. दगड-चरींमुळे डोहात उतरणे धोक्याचे असताना तरुणाईचा अतिउत्साह जिवावार बेतणारा ठरला. सोळा वर्षांत येथील हा पहिलाच दुर्दैवी अपघात आहे.
गावावर पसरली शोककळा
इम्रानचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याला एक वर्षाची मुलगी आहे. त्याचा धाकटा भाऊ अनिसचा सहा वर्षांपूर्वी चिकली-प्रयाग येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. आंबवडे फाट्यावर त्याचे एस. एम. बॅटरीचे दुकान आहे. त्याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)