पन्हाळगडची पायी प्रदक्षिणा चार जानेवारीला
By Admin | Updated: December 26, 2014 23:44 IST2014-12-26T23:42:52+5:302014-12-26T23:44:55+5:30
एकविसावे वर्ष : हिल रायडर्स अँड हायकर्सच्या उपक्रमाची नोंद लिम्का, एशिया बुकमध्ये होणार

पन्हाळगडची पायी प्रदक्षिणा चार जानेवारीला
कोल्हापूर : आजच्या आधुनिक आणि बदलत्या काळात तरुणांच्या मनामध्ये ऐतिहासिक गडसंवर्धन, इतिहास आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी, या हेतूने प्रतिवर्षी हिल रायडर्स अॅँड हायकर्स गु्रपच्यावतीने ‘पन्हाळगड पायी प्रदक्षिणा’ आयोजित केली जाते. यंदा ही पायी प्रदक्षिणा मोहीम रविवारी (दि. ४ जानेवारी) आयोजित केल्याची माहिती गु्रपचे अध्यक्ष
प्रमोद पाटील व ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी आज,
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिलाहाराच्या राजघराण्यातील गंडरादित्याची राजधानी बनलेला हा भव्य व उत्तुंगगड शिवरायांनी आदिलशाहीकडून जिंकून घेतला. वीर शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या असंख्य शिवभक्तांनी इथे अतुलनीय पराक्रम गाजविला आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ल्याखाली पश्चिम घाटातील दुर्मीळ अशी जैवविविधता आहे. याची माहिती नव्या पिढीस व्हावी, याकरिता या मोहिमेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते.
यंदा या मोहिमेचे एकविसावे वर्ष असून यात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, शिवदुर्ग प्रतिष्ठान, सहजसेवा ट्रस्टनेही सहभागी होत उपक्रमाला बळ दिले आहे. या उपक्रमाची दखल लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस व आशिया बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस हेही घेणार आहेत. ही मोहीम एक दिवसाची असून, या मोहिमेत निसर्गप्रेमी, गडप्रेमी, इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी, आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, चंदन मिरजकर, आदी उपस्थित होते.