प्राणावर आले, पण पायावर निभावले !
By Admin | Updated: December 11, 2014 00:34 IST2014-12-11T00:30:52+5:302014-12-11T00:34:56+5:30
रेल्वेची माणुसकी : एक्स्प्रेस थांबवून मिरजेत आणला तुटलेला पाय

प्राणावर आले, पण पायावर निभावले !
मिरज : मायाक्का चिंचली रेल्वे स्थानकात रेल्वे अपघातात पाय तुटून जखमी झालेल्या नीलेश शंकर हिरवे (वय २१ रा.गुहागर, जि. रत्नागिरी) या वैद्यकीय विद्यार्थ्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनीही सहृदयता दाखवत, हरिप्रिया एक्स्प्रेस थांबवून त्याचा तुटलेला अवयव मिरजेला आणून पोहोच केला. मात्र, शस्त्रक्रियेने पाय जोडण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
पारगाव (ता. कोडोली, जि. कोल्हापूर) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची म्हैसूर, बेंगलोर येथे सहल गेली होती. सहल आटोपून आज, बुधवारी सकाळी हे विद्यार्थी राणी चन्नम्मा एक्स्प्रेसने कोल्हापूरला येत होते. नीलेश हिरवे मित्रांसोबत याच रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करीत होता. रेल्वे स्थानकात थांबल्यावर तो खाली उतरून इकडून-तिकडे फिरत होता. सर्वांचा आनंदात प्रवास सुरू होता. सकाळी मायाक्का चिंचली घोट्यापासून पाय तुटला. तसेच जखमी अवस्थेत नीलेशला उपचारासाठी मिरजेत आणण्यात आले. अपघाताची माहिती मिरज स्थानकात कळविण्यात आल्याने मिरज स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. रेल्वे स्थानकात आल्यानंतर नीलेशला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तुटलेला पाय जोडता येणे शक्य असल्याने डॉक्टरांनी तुटलेला अवयव तातडीने आणण्यास सांगितले.
मिरज ते मायाक्का चिंचली हे सुमारे ३० किलोमीटर अंतर असल्याने चिंचली स्थानकात पडलेला नीलेशचा अवयव आणण्यासाठी एक तास जाणार होता. नीलेशसोबत असलेल्या अध्यापकांनी रेल्वे स्थानकात धाव घेऊन स्थानक अधीक्षक मोहन मुसद यांना नीलेशच्या शस्त्रक्रियेसाठी त्याच्या अवयवाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
एका तरुण वैद्यकीय विद्यार्थ्याच्या आयुष्याचा प्रश्न असल्याने मुसद यांनी नीलेशचा अवयव त्यावेळी मिरजेकडे येत असलेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसमधून आणण्याचा निर्णय घेतला. मायाक्का चिंचलीला थांबा नसतानाही हरिप्रिया एक्स्प्रेस तेथे थांबविण्यात आली. एक्स्प्रेसच्या गार्डने नीलेशच्या तुटलेल्या पायाचा भाग ताब्यात घेऊन मिरजेत आणला. महाविद्यालयातील प्रा. आनंद कुलकर्णी यांनी हरिप्रिया एक्स्प्रेसच्या गार्डकडून अवयव ताब्यात घेऊन रुग्णालयात नेला. मात्र, नीलेशच्या पायाचा रेल्वे अपघातात पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे शस्त्रक्रियेने पाय जोडता आला नाही. रेल्वे अपघातात जखमी नीलेश बरा व्हावा, यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी नियमावर बोट न ठेवता माणुसकीचे दर्शन घडविले.
मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला यश न आल्याने सर्वांनाच रूखरूख लागली. नीलेश हा गुहागरमधील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून, रेल्वे अपघातात तो जखमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सहलीच्या आनंदावर विरजण पडले.
पारगावच्या कोरे दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी
रेल्वे अपघातात जखमी झालेला नीलेश हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील असून, तो कोल्हापुरातील पारगावच्या दंत महाविद्यालयातील विद्यार्थी आहे.
अपघातात नीलेशच्या कमरेचा सांधा निखळला आहे. उजवा पाय घोट्यापासून तुटला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यास कृत्रिम पायाचा वापर करता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.