Pramod Savant gets political bail from Kolhapur: Chief Minister of Goa, Leap: Medical education in Kolhapur | प्रमोद सावंत यांना कोल्हापुरातून राजकीय बाळकडू -गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी झेप : वैद्यकीय शिक्षण कोल्हापुरात

प्रमोद सावंत यांना कोल्हापुरातून राजकीय बाळकडू -गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी झेप : वैद्यकीय शिक्षण कोल्हापुरात

ठळक मुद्देलढविली जी.एस. पदाची पहिली निवडणूक

कोल्हापूर : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती होणार आहे. सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापुरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी निवडून येऊन आपल्यातील नेतृत्वगुणाची चुणूक दाखविली.
गोव्यातील छोट्याशा खेड्यातून आलेल्या सावंत यांचे वडील हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातूनच राजकीय व सामाजिक कार्याचे धडे मिळाले.

बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सन १९९१ मध्ये ते कोल्हापुरातील रंकाळवेश दुधाळी परिसरातील गंगा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये दाखल झाले. या काळात ते रंकाळा परिसरात भाड्याने राहिले. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून मित्रपरिवाराने त्यांना सन १९९२ मध्ये जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीसाठी उभे केले. त्यामध्ये ते भरघोस मतांनी विजयी झाले. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक होती. या निमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सन १९९७ मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी घेतली. या काळात त्यांचा अनेकांशी ऋणानुबंध आला. ते अंबाबाईचे निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी ते नवरात्रात न चुकता अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात तसेच ते आपल्या महाविद्यालयीन मित्रपरिवारालाही आवर्जून भेटतात. गप्पांचा फड रंगतो व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

ते सन २०१२ मध्ये पहिल्यांदा साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी कोल्हापुरातील त्यांच्या सन १९९७ च्या बॅचने त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी होऊन विधानसभा सभापती झाल्यानंतरही कोल्हापुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापुरात आल्यावर ते आवर्जून माझ्या उचगाव येथील निवासस्थानी राहायला यायचे, आमदार असतानाही ते आले होते; परंतु आता राजशिष्टाचारामुळे त्यांना ते शक्य होत नाही; परंतु आमच्या भेटीगाठी होत असतात, असे रणजित सावंत यांनी सांगितले.
 

आमचा वर्गमित्र हा गोव्याचा मुख्यमंत्री झाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. सर्वांत तरुण व मनमिळाऊ असणारे माझे मित्र प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास आहे. त्यांचा आम्ही कोल्हापुरात सत्कार करणार आहोत.
- डॉ. रणजित सावंत

गोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रमोद सावंत यांचा त्यांच्या डॉक्टर मित्रांनी अंबाबाईची मूर्ती देऊन कोल्हापुरात सत्कार केला होता.

Web Title: Pramod Savant gets political bail from Kolhapur: Chief Minister of Goa, Leap: Medical education in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.