राजकीय द्वेषातून प्रकाश आवाडेंचे बिनबुडाचे आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:30+5:302021-05-10T04:23:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर केलेले आरोप हे खोटे व निराधार आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार ...

Prakash Awade's baseless allegations of political hatred | राजकीय द्वेषातून प्रकाश आवाडेंचे बिनबुडाचे आरोप

राजकीय द्वेषातून प्रकाश आवाडेंचे बिनबुडाचे आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर केलेले आरोप हे खोटे व निराधार आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार प्रकाश आवाडे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून महाविकास आघाडी याचे खंडन करीत आहे. तसेच आवाडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आयजीएम हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा व स्वच्छता उपलब्ध करून देण्यासाठी अग्रक्रम देण्याऐवजी मेडिकल कॉलेजचा अट्टहास कशासाठी करायचा? तसेच वारंवार आयजीएमच्या त्या ४२ कर्मचाऱ्यांचा प्रश्न का ऐरणीवर आणला जातो? हा प्रकार नवीन नाही. नेहमी तेच-तेच आरोप केले जातात. एकीकडे शासनाला लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे १८ कोटी मंजूर केल्याचे दाखवून द्यायचे, हे हास्यास्पद असल्याचे नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले. आवाडे हे चुकीच्या पद्धतीने आरोप करीत असून भ्रम पसरविण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यातील तीनही मंत्री इचलकरंजी शहराकडे कुटुंब म्हणून पाहत आहेत. आरोप करण्यापेक्षा शहराला आधार द्यावा, असा सल्ला नगरसेवक राहुल खंजिरे यांनी दिला.

नगरसेवक मदन कारंडे व विठ्ठल चोपडे यांनी, मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यावर कोविड केंद्र उभा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आवाडे यांनी जवाहर साखर कारखान्यावर केंद्र अद्यापही का सुरू केले नाही? केवळ इतरांवर आरोप करण्याचे राजकारण ते करीत आहेत. त्यांनी लोकांची डोकी भडकावू नयेत. आमदार झाल्यापासून एकतरी भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश पाटील, महादेव गौड, सयाजी चव्हाण, आदी उपस्थित होते.

Web Title: Prakash Awade's baseless allegations of political hatred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.