कृषी संशोधन परिषदेचे प्रकाश आबिटकर उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:12+5:302021-05-19T04:24:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आनंदराव आबिटकर यांची राज्य शासनाने मंगळवारी महाराष्ट्र कृषी शिक्षण व ...

कृषी संशोधन परिषदेचे प्रकाश आबिटकर उपाध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आनंदराव आबिटकर यांची राज्य शासनाने मंगळवारी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत चालू राहील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर त्यांना राज्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु ती संधी हुकल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांनी त्यांची या पदावर वर्णी लावली.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे समन्वय व मूल्यमापन करण्याची जबाबदारी या परिषदेवर असते. कृषी मंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात. यापूर्वी काँग्रेस आघाडीच्या काळात विजय कोलते त्यांच्यानंतर राम खडसे, संजय धोत्रे यांनी उपाध्यक्षपदाचे काम पाहिले. मुख्यत: शैक्षणिक व संशोधनात्मक दिशा निश्चित करण्याचे काम ही परिषद करते. शैक्षणिक स्वरुपाचे काम असल्याने या पदाला इतर राजकीय पदांसारखे ग्लॅमर नसते. ज्याला कृषीविषयक अभ्यासाची मुळात आवड आहे, ती व्यक्ती या पदाचा वापर करून काही चांगले बदल राज्याच्या कृषी विद्यापीठांच्यामार्फत नक्की घडवून आणू शकते. आमदार आबिटकर पक्षाशी एकनिष्ठ आमदार असून ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले ते एकमेव आमदार आहेत.