प्रधान सचिवांची हेळेवाडीच्या विद्यार्थ्यांना शाबासकी

By Admin | Updated: November 23, 2015 00:27 IST2015-11-22T23:31:21+5:302015-11-23T00:27:54+5:30

प्राथमिक शाळेला भेट : दिलखुलास संवाद साधत चिमुकल्यांचे कौतुक; नेसरीच्या उर्दू शाळेचीही पाहणी

Pradhan Sewitvana's hellowadi students cheered on | प्रधान सचिवांची हेळेवाडीच्या विद्यार्थ्यांना शाबासकी

प्रधान सचिवांची हेळेवाडीच्या विद्यार्थ्यांना शाबासकी

नेसरी : राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा प्रधान सचिव नंदकुमार यांनी नेसरीतील उर्दू शाळा, हेळेवाडीतील मराठी माध्यमाच्या शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यांच्यात रममान झाले. मुलांचे गणितातील प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञानाचे, तसेच भाषेतील बारकाव्यांची कसोटी पाहिली. यावेळी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
‘ज्ञानरचनावाद’ हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसे उपयुक्त आहे, हे पाहण्यासाठी सचिव नंदकुमार यांनी हेळेवाडी, दुंडगे व नेसरीतील उर्दू शाळांना रविवारी भेटी दिल्या. नेसरी येथे सकाळी १० वाजता मुख्याध्यापक फैयाज तहसीलदार व असिफ मुजावर यांनी नंदकुमार यांचे स्वागत केले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून ई-लर्निंग शिक्षणाचीही वाहवा केली. नंतर कन्या शाळेस भेट दिली. त्यानंतर हेळेवाडी प्राथमिक शाळेला भेट देऊन ज्ञानरचनावादी शैक्षणिक प्रगतीची चाचपणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संवाद साधला. मुख्याध्यापिका प्रेमलता कदम व शशिकला पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
नंदकुमार यांच्यासमवेत जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी जोत्स्ना पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी महावीर माने, माध्यमिक शिक्षण संचालक नामदेवराव जरग, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, एस.एस.सी. बोर्ड सचिव शरद गोसावी, प्राचार्य डॉ. विलास पाटील, सहसंचालक अजित पोतदार, विज्ञान सल्लागार रणदिवे, प्रभारी गटविकास अधिकारी (गडहिंंग्लज) प्रदीप जगदाळे, नेसरी केंद्रप्रमुख क. ई. पाटील, गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर, रमेश कोरवी, आदी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा ताफा होता. (वार्ताहर)


आपुलकी मुलांची
नंदकुमार यांचा ताफा हेळेवाडी शाळेकडे चालला होता. याच दरम्यान त्यांना नेसरीतील मसणाईदेवी मंदिराजवळ १०-१२ झोपड्या निदर्शनास आल्या. त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितले व झोपड्यांच्या आवारात प्रवेश केला. त्यामुळे अधिकाऱ्यांसह येथील महिला व मुले भांबावून गेली.
नंदकुमार यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. मुले शाळेला जातात का? त्यांना दररोज शाळेला पाठवा, असा सल्ला दिला. या गरीब कुटुंबांनीही साहेबांच्या हाकेला ओ दिली. शाळाबाह्य मुलांच्या चौकशीने त्यांनी साहेबांचे आभार मानले.

Web Title: Pradhan Sewitvana's hellowadi students cheered on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.