प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा शाहूवाडी तालुक्यातील ३६१७ महिलांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:56+5:302021-02-14T04:22:56+5:30
अनिल पाटील सरुड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत आजअखेर शाहूवाडी तालुक्यातील ३६१७ गर्भवती व ...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा शाहूवाडी तालुक्यातील ३६१७ महिलांना लाभ
अनिल पाटील
सरुड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत आजअखेर शाहूवाडी तालुक्यातील ३६१७ गर्भवती व प्रसूती झालेल्या महिला मातांना सुमारे १ कोटी ४८ लाख ६८ हजार रु. चा आर्थिक लाभ देण्यात आला आहे . शाहूवाडीसारख्या दुर्गम व डोंगराळ तालुक्यांतील गर्भवती माहिलांची पहिली प्रसूती सुलभ होण्याबरोबरच जन्माला येणाऱ्या बालकाच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी ही योजना लाभदायक ठरत असून, तालुक्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाने विशेष करून गर्भवती महिलांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाकडे पहिल्या बाळंतपणासाठी नोंदणी केलेल्या सर्व गर्भवती महिलांना, तसेच प्रसूती झालेल्या माहिलांना त्यांच्या स्वत:च्या व बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ५ हजार रुपयांचा शासकीय आर्थिक लाभ देण्यात येत आहे. हा लाभ तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतो. यामध्ये पाहिला १ हजार रु.चा हप्ता गर्भवती महिलेची नोंदणी केल्यानंतर दिला जातो. त्यानंतर दुसरा २ हजार रु.चा हप्ता गर्भधारणेच्या ६ महिन्यांनंतर, तर तिसरा दोन हजार रु. चा हप्ता प्रसूतीनंतर बाळाचे तीन डोस पूर्ण झाल्यानंतर असे एकूण ५ हजार रुपये संबंधित गर्भवती महिलांच्या बँक खात्यावर जमा होतात. या रकमेचा उपयोग गर्भवती माहिला मातांना आपल्यासह आपल्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करण्याचा आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजअखेर शाहूवाडी तालुक्यात मलकापूर ग्रामीण रुग्णालयासह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे, त्यांअंतर्गत येणारी ३८ उपकेंद्राकडे पहिल्या प्रसूतीसाठी नोंदणी झालेल्या व प्रसूती झालेल्या सुमारे ३६१७ गर्भवती लाभार्थी महिलांना या मातृ वंदना योजनेचा लाभ मिळाला आहे.
कोट....
आरोग्य विभागाकडे पहिल्या प्रसूतीसाठी नोंदणी केलेल्या, तसेच प्रसूती झालेल्या ज्या गर्भवती महिलांनी आपला बँक खाते नंबर, आधार कार्ड, आदी कागदपत्रे आरोग्य विभागाकडे दिलेली नाहीत त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे संबंधित आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका, आशासेविका यांच्याकडे जमा करावीत.
डॉ. एच. आर. निरंकारी . =
तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी