‘प्रधानमंत्री विमा’चा उद्या प्रारंभ

By Admin | Updated: May 8, 2015 00:14 IST2015-05-07T23:47:35+5:302015-05-08T00:14:20+5:30

पालकमंत्र्यांच्या हस्ते विमापत्रे : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅँकांची ग्वाही; थेट प्रक्षेपण

'Pradhan Mantri Insurance' tomorrow starts | ‘प्रधानमंत्री विमा’चा उद्या प्रारंभ

‘प्रधानमंत्री विमा’चा उद्या प्रारंभ

कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी तीन दिवसांत जिल्ह्णात १ लाख १५ हजार खाती करणार, अशी ग्वाही जिल्ह्णातील ३३० राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी दिली. उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होईल.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दोन विमा योजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, बॅँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्णातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्या, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्णांत ही योजना सुरू करण्यात येणार असून, कोल्हापूरचा त्यामध्ये समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी गुरुवारपासून राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या सर्व शाखांमधून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्ह्णातील राष्ट्रीयीकृत बॅँकांची संख्या ३३० आहे. बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी सर्व शाखांमधून गुुुरुवारपासून उद्या, शनिवारपर्यंत १ लाख १५ हजार खाती केली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिली
दरम्यान, या प्रधानमंत्री विमा व अटल पेन्शन योजनेचा कोल्हापूर जिल्ह्णातील प्रारंभाचा कार्यक्रम शनिवारी (दि. ९) सायंकाळी साडेपाच वाजता शाहूपुरीतील श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवनात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ करण्यात येईल. यावेळी योजनेची माहिती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथे योजनेचा प्रारंभ, विमापत्रे आणि पेन्शनच्या पासबुक वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येईल. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्णातील दहा खातेदारांना विमापत्रे आणि पेन्शनच्या पासबुकांचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे.
या कार्यक्रमास बँक आॅफ इंडियाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाचे सरव्यवस्थापक जी. बी. काकडे, कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन् उपस्थित असतील. (प्रतिनिधी)

केवळ ३४२ रुपयांमध्ये चार लाखांचा विमा
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत दोन लाखांचा विमा नैसर्गिक मृत्यूसाठी आहे. १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी तो ३३० रुपयांत उतरविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा दोन लाखांचा विमा अपघातात दुखापतीसाठी व अपंगत्वासाठी लागू असणार आहे. हा विमा केवळ १२ रुपयांत वर्षभरासाठी असेल. १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या सर्व शाखांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: 'Pradhan Mantri Insurance' tomorrow starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.