गुणवत्ता टिकविण्यासाठी सरावच आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:14+5:302020-12-05T04:54:14+5:30
कोल्हापूर : सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. त्यामुळे गुणवत्ता टिकवण्यासाठी सराव हा हवाच, असे मत ...

गुणवत्ता टिकविण्यासाठी सरावच आवश्यक
कोल्हापूर : सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. त्यामुळे गुणवत्ता टिकवण्यासाठी सराव हा हवाच, असे मत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनुदानित वसतिगृह अधीक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा चंदगड तालुक्यातील हेरे येथील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे होते. यावेळी समाजकल्याण निरीक्षक सदानंद बगाडे, सुभाष पवार, छत्रपती शाहू महाराज वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष राजाराम कांबळे, बाबासाहेब आब्रे, साताप्पा कांबळे उपस्थित होते.
सातपुते म्हणाले, ज्या व्यवसायात किंवा क्षेत्रात आहात त्यातील आपले कौशल्य धारदार करत रहा. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा. दीपक घाटे म्हणाले, कोरोनानंतर वसतिगृह कशा पद्धतीने सुरू करायची, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करायचे, हा हेतू ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही सर्वजण उत्तम काम करत आहात. वसतिगृहांसाठी लागणाऱ्या सुविधा, साधनसामग्री निश्चितपणे पुरविण्यात येईल.
स्वागत विलास कांबळे, प्रास्ताविक जी. एस. देसाई यांनी तसेच सूत्रसंचालन नवनीत पाटील यांनी केले. वंदना कांबळे, विद्या लंबे आदींसह जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांचे अधीक्षक, स्वयंपाकी, पहारेकरी उपस्थित होते.