प्रॅक्टिस क्लब उपांत्य फेरीत
By Admin | Updated: April 9, 2016 00:56 IST2016-04-09T00:19:30+5:302016-04-09T00:56:16+5:30
नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा : फुलेवाडीवर सडनडेथने मात

प्रॅक्टिस क्लब उपांत्य फेरीत
कोल्हापूर : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात प्रॅक्टिस क्लबने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर सडनडेथने मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर शुक्रवारी प्रॅक्टिस क्लब व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात उपांत्यपूर्व सामना झाला. सामना चुरशीचा होणार ही अपेक्षा धरून मोठ्या प्रमाणात फुटबॉल रसिकांनीही सामना पाहण्यास गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. ‘प्रॅक्टिस’कडून योगेश कदम, सुशांत अतिग्रे, ओंकार पाटील, इंद्रजित मोंडल, वैभव राऊत, अजिंक्य गुजर यांनी अनेक चाली रचल्या. मात्र, फुलेवाडी संघाच्या भक्कम बचावफळीने त्या परतावून लावल्या, तर फुलेवाडी संघाकडून करण चव्हाण-बंदरे, रोहित मंडलिक, कपिल साठे, तेजस शिंदे, रोवन परेरा यांनी खोलवर चढाया करीत गोल करून आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. कपिल साठे याने रोवन परेराच्या पासवर गोल करण्याची एक संधीही गमावली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून गोल न करता आल्याने पूर्वाध गोलशून्य बरोबरीत गेला.
उत्तरार्धात प्रॅक्टिस संघाने खेळात बदल करीत आक्रमक व वेगवान चाली रचण्यास प्रारंभ केला. योगेश कदम याच्या पासवर इंद्रजित मोंडलची सोपी संधी वाया गेली. त्यानंतर ‘फुलेवाडी’कडून माणिक पाटील याने मारलेल्या बायसिकल किकचा फटका गोलपोस्टवरून बाहेर गेला. या किकला प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.
या संधीनंतर प्रॅक्टिस क्लबच्या योगेश कदम याने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका थेट गोल पोस्टवरून गेला. ‘प्रॅक्टिस’कडून अमोल पसारे, ‘फुलेवाडी’कडून निखिल खाडे यांनी उत्कृष्ट गोलरक्षण करीत आपल्या संघावर होणारे गोल वाचविले. अखेरपर्यंत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्येही ‘प्रॅक्टिस’कडून सचिन बारामते, इंद्रजित मोंडल, राहुल गायकवाड यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून रोहित मंडलिक, कपिल साठे, माणिक पाटील यांनी गोल नोंदवीत ३-३ असा पुन्हा सामना बरोबरीत आणला. त्यामुळे मुख्य पंचांनी सडनडेथचा अवलंब केला. यामध्येही ‘प्रॅक्टिस’कडून प्रतीक बदामे, ओंकार पाटील यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून निखिल जाधवने गोल केला.
अखेरीस २-१ अशी स्थिती असताना ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे याने मारलेला फटका प्रॅक्टिस क्लबचा गोलरक्षक राहुल देसाई याने लिलया तटवीत आपल्या संघास विजय मिळवून दिला. या विजयामुळे प्रॅक्टिस क्लब स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला.