पारंपरिक थाटात प्रबोधनाचा जागर

By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-20T00:05:56+5:302015-02-20T00:08:26+5:30

शहरात शिवजयंतीचा उत्साह : मर्दानी खेळ, लेझीमसह उंट, घोड्यांच्या लवाजम्याने वाढविली शोभा

Prabodhana Jagar in the traditional place | पारंपरिक थाटात प्रबोधनाचा जागर

पारंपरिक थाटात प्रबोधनाचा जागर

सर्व जाती-धर्माच्या, विविध विचारांच्या तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्ष व संघटना कार्यकर्त्यांच्या सहभागाद्वारे राष्ट्रीय एकात्मता जोपासत तसेच शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत शिवजयंती मिरवणूक काढण्याची परंपरा शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने गुरुवारीही कायम राखली. विशेष म्हणजे या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक प्रबोधनालाही प्राधान्य दिले. शिवरायांचा जागर, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोलांचा गजर आणि तुतारीच्या ललकारीसोबतच डॉल्बीचा दणदणाट यामुळे संपूर्ण मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून सायंकाळी साडेपाच वाजता शाहू छत्रपती महाराज तसेच आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा नारा आणि तुतारीच्या ललकारीने मिरवणुकीत सळसळता उत्साह निर्माण केला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजित खराडे, सचिव महेश जाधव, राहुल इंगवले, सुरेश जरग, अशोकराव साळोखे, अरुणराव साळोखे, चंद्रकांत यादव, रामभाऊ चव्हाण, स्थायी समिती सभापती आदिल फरास, धनंजय पठाडे, लालासाहेब गायकवाड, रविकिरण इंगवले, चंद्रकांत साळोखे, अशोक देसाई, वसंत मुळीक, परीक्षित पन्हाळकर, उत्तम कोराणे, अजित राऊत, आदी उपस्थित होते. मिरवणुकीत दहा घोडी व सहा उंट होते. त्यावर इतिहासकालीन मावळ्यांच्या वेषात तरुण बसले होते. शिवरायांच्या जीवनावर काही सजीव देखावे मिरवणुकीत सादर केले. अनेक कार्यकर्त्यांनी भगवे व मखमली फेटे बांधून मिरवणुकीत ऐतिहासिक बाज जपला. मुलींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. ठोंबरे वस्तादांच्या पथकाने मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी एक थरार निर्माण केला. हलगीच्या कडकडाटाने वीरश्री निर्माण केली. झांज, धनगरी ढोलांच्या पथकांनी मिरवणुकीची पारंपरिकता जपली, तर हरिपूरच्या बँडने मिरवणुकीत लोकांची मने जिंकली. यंदा पारंपरिक वाद्यांसोबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीही आणली होती. ‘ही आमची शिवाजी पेठ’ हे खास मिरवणुकीचे थीम साँग लक्षवेधी ठरले.
शिवजयंती मिरवणुकीत सामाजिक प्रबोधनाला शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यंदाच्या मिरवणुकीत हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. व्यसनाधीन तरुण पिढीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी एक खास फलक मिरवणुकीत होता. ‘गुटखा, तंबाखूची मळता मळी, आरं आरं भाव कॅन्सर उतरंल तुमच्या गळी’ ही स्लोगन प्रभावीपणे लिहिण्यात आली होती. याशिवाय रंकाळा तलावाची दुर्दशा, महिलांची छेडछाड, तीर्थक्षेत्र आराखडा, मराठा आरक्षण, फुटबॉल, आदी विषयांवरही समाजप्रबोधनपर फलक होते. हे सर्व फलक बैलगाड्यांवर ठेवण्यात आले होते. सगळ्यात शेवटी एका ट्रॅक्टरवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. मिरवणूक शहराच्या विविध मार्गांवरून फिरून रात्री शिवाजी पेठेत विसर्जित झाली. पोलीस बंदोबस्त चोख होता. (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणावर कोटी
सामाजिक प्रबोधन करण्याच्या हेतूने मिरवणुकीत बैलगाड्यांवर अनेक फलक उभारले होते. मराठा आरक्षणावर एक कोटी करण्यात आलेला फलक होता. त्यावर लिहिण्यात आले होेते, ‘मराठा समाजाला वाटाण्याच्या अक्षता, गूळ संपला की मुंगळे वारूळ बदलतात, यात्रा संपली की पुजारी देवळं बदलतात. राजकारण्यांचंही असंच असतं, सत्ता मिळताच नेते ‘शब्द’ बदलतात.’

Web Title: Prabodhana Jagar in the traditional place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.