‘प्रबोधन अभियाना’तून समाजप्रबोधन करणार
By Admin | Updated: August 2, 2015 23:39 IST2015-08-02T23:39:29+5:302015-08-02T23:39:29+5:30
लक्ष्मणराव ढोबळे : अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त १७ जिल्ह्यांतील वस्तींवर जाणार

‘प्रबोधन अभियाना’तून समाजप्रबोधन करणार
कोल्हापूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील अनिष्ट चालीरिती व परंपरांविषयी प्रत्येक वस्तीवर जाऊन ‘समाजप्रबोधन अभियाना’च्या माध्यमातून प्रबोधन करणार असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेचे संस्थापक, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समाजप्रबोधन अभियानासाठी प्रा. ढोबळे रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रा. ढोबळे म्हणाले, मातंग समाजातील चुकीच्या परंपरा बाजूला ठेवून त्यांनी काय करावे, यासाठी या अभियानास १ आॅगस्टपासून सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून सुरुवात केली असून, १७८५ किलोमीटरचा प्रवास करत १७ जिल्ह्यांत फिरणार आहे. अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने स्वत:च्या अंगणात एकतरी झाड लावून ते वर्षभर जोपासावे. अण्णांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथेवर प्रहार केले. यासाठी समाज व्यसनमुक्त व्हावा, आपली वस्ती-परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा. शाळाबाह्य मुलांना एकत्रित करून मिरवणुकीने शाळेत पाठवावीत. भपकेबाज जयंती साजरी न करता समाजातील हुशार मुलांच्या उच्चशिक्षणासाठी मदत करावी. उद्योग, संगीत, शिक्षण या क्षेत्रांत आपण कुठे आहोत याचे आत्मचिंतन समाजाला या प्रबोधन यात्रेतून करायला लावणार असल्याचे प्रा. ढोबळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात अण्णांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अभियान यात्रेत सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी असून घराघरांत जाऊन प्रत्येक माणसांशी संवाद साधून प्रबोधन करणार आहे. एकवेळ अर्धपोटी राहा; पण मुलांना शाळेत पाठवा, वाचन संस्कृती वाढवा, विचारवंतांची व्याख्याने घ्या, तरुण बलदंड पोरांची संघटना निर्माण करा, आदी बाबींवर अभियानात लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सर्जेराव गायकवाड, दादासाहेब तांदळे, सुभाष सोनुले, उत्तमराव भैसणे, दिगंबर घंटेवाढ, वसंत यादव, सुभाष वायदंडे, गोविंद वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बारशाला ‘अंगठी’ऐवजी ‘वीरसंभाजी’, ‘फकिरा’ द्या
मुलाच्या बारशाला आपण सोन्याची अंगठी देतो. त्याऐवजी ‘वीर संभाजी’, ‘फकिरा’, ‘गुलाम’ अशी पुस्तके द्या. त्यामुळे मुलाच्या अंगात बाणेदारपणा येईल, याचेही प्रबोधन करणार असल्याचे प्रा. ढोबळे यांनी सांगितले.
संघर्षाची तयारी...
समाजातील समस्या सोडविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. समाजाने मला फार मोठे केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी संघर्षाची तयारी आहे. समाजासाठी पडेल ती किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर, असा इशारा प्रा. ढोबळे यांनी दिला.
पवार घराण्याने खूप दिले
गेली २५ वर्षे राजकारणात वावरत असताना पवार घराण्याने मला खूप दिले. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राज्याचा मंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस व पवार घराण्यावर बोलणे मला योग्य वाटत नसल्याचेही प्रा. ढोबळे यांनी सांगितले.
फवारणीचा पंपच खोटा निघाला
शेतातील फवारणीचा पंप जुना झाला म्हणून पक्षाने नवीन पंप खरेदी केला; पण तो पंपच खोटा निघाला. तिथे पक्ष काय करणार, अशी उपरोधात्मक टीका माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आमदार रमेश कदम यांचे नाव न घेता केली. निवडणुका महागड्या झाल्याने पुन्हा कोणत्याही निवडणुकीला उभे राहणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली.