वीज वितरण अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार
By Admin | Updated: July 21, 2014 23:57 IST2014-07-21T23:57:28+5:302014-07-21T23:57:28+5:30
शिवसेनेचा इशारा : मुरगूड परिसरातील गैरसोयी

वीज वितरण अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार
मुरगूड : मुरगूड परिसरातील कापशी, हसूर, बोळावी आदी भागांतील उच्चदाब असलेले विजेचे खांब धोकादायक स्थितीमध्ये आहेत. याबाबत वीज वितरण कार्यालयाला माहिती देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील, असा इशारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी दिला आहे.
मुरगूड कापशी परिसरामध्ये उच्च दाबाने विद्युत प्रवाह नेणारे अनेक लांब धोकादायक स्थितीत आहेत. याकडे वीज कार्यालयाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हसून बुद्रुक येथील घुगरे माळा, शिंदेवाडी माळ या परिसरातून उच्चदाबाची मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. अवकाळी व वादळी पावसामुळे हे विद्युत खांब वाकलेले आहेत ते कधीही कोसळतील, अशी परिस्थिती आहे. या परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार करूनही कोणताच कर्मचारी इकडे फिरकला नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हे कर्मचारी, अधिकारी डोळे उघडणार काय, असाही प्रश्न हे नागरिक उपस्थित करत आहेत.
जैताळ, उंदरवाडी आदी ठिकाणी कंपनीच्या डोळेझाक कारभारामुळेच काही लोकांना प्राण गमवाावे लागले आहेत. त्यामुळे भागातील धोकादायक विजेचे खांब वीजपेट्या तत्काळ बदलल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा भोकरे यांनी दिला आहे. यावेळी सागर भोसले, राजेश देवेकर, बाजीराव आंगज उपस्थित होते.