भांडी विक्रेत्यांना ५० लाखांचा दिवसाकाठी बसतो फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:11+5:302021-05-10T04:23:11+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यावसायिकांचे उरले-सुरलेही कंबरडे मोडले आहे. त्यापैकीच एक भांडी विक्रेत्यांनाही मोठ्या अर्थिक संकटाला ...

भांडी विक्रेत्यांना ५० लाखांचा दिवसाकाठी बसतो फटका
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यावसायिकांचे उरले-सुरलेही कंबरडे मोडले आहे. त्यापैकीच एक भांडी विक्रेत्यांनाही मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अशा १६०हून अधिक व्यावसायिकांचे दिवसाकाठी सुमारे ५० लाखांहून अधिकचे नुकसान होत आहे. तर जीएसटी. बँक कर्ज, व्यवसायासाठी घेतलेले सावकरी कर्ज, पाल्यांच्या शाळांची फी अशा एक ना अनेक समस्यांमुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय मोडकळीस आला आहे.
भारतीय जीवन पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोनवेळा जेवण्याची सवय आहे. त्यात मग कोणते पदार्थ खायचे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, ते जेवण कोणत्या भांड्यात करायचे, असा प्रश्न आला तर अनेकांना अशावेळी भांडी दुकाने आठवतात. मात्र, तिच जर बंद असतील तर अनेकांच्या जेवणाचे वांदेच होतात. सध्या लाॅकडाऊनमुळे ठराविक काळापुरतेच अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे गेल्या २६ दिवसांत अपेक्षित व्यवसाय नसल्याने जिल्ह्यातील १६०हून अधिक भांडी विक्रेत्यांना अर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे ५० लाखांचा फटका या व्यावसायिकांना बसत आहे. लाॅकडाऊनचा कालावधी वाढला तर जगायचं कसं आणि कामगारांचा पगार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने कराची वसुली, बँक हप्त्यांच्या वसुलीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत.
जिल्ह्यात दुकाने - १६०
निर्भर असणाऱ्यांची संख्या - २०००हून अधिक
दिवसाकाठी नुकसान - सुमारे ५० लाख
चौकट
अडचणी अनंत
व्यवसाय ठप्प झाल्यामुळे जीएसटी रिटर्न, बँकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. कामगारांचे पगार, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, व्यवसायासाठी घेतलेली हात उसने (सावकारी कर्जे), दुकानभाडे, महापालिका कर, अशा एक ना अनेक अडचणींना या व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे.
कोट
भांडी विक्री व्यवसाय अत्यावश्यक सेवेत नसल्याने केवळ दोन ते तीन तासच दुकाने उघडी ठेवता येतात. त्यातून कामगारांचा पगारसुद्धा निघत नाही. याशिवाय बँकांचे कर्जाचे हप्ते, जीएसटी कर, व्यावसायिक कर, आदी कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने करांमध्ये सवलत द्यावी.
- अमर वणकुद्रे, भांडी व्यापारी