पोतदार दाम्पत्य पोलिसांत हजर
By Admin | Updated: May 8, 2014 12:13 IST2014-05-08T12:13:19+5:302014-05-08T12:13:19+5:30
कमळकर मारहाण प्रकरण : एक दिवसांची पोलीस कोठडी

पोतदार दाम्पत्य पोलिसांत हजर
कोल्हापूर : शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी फरारी असलेल्या शाहूवाडीच्या माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्या प्रभावती पोतदार (वय ३५) व त्यांचे पती प्रकाश नामदेव पोतदार (४५, रा. नम्रता हौसिंग सोसायटी, सुर्वेनगर) हे दोघेही आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. १५ दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांना जिल्हा परिषदेच्या प्रतीक्षाकक्षातून बाहेर येताना संशयित प्रभावती पोतदार व प्रकाश पोतदार यांनी मारहाण केली होती. त्यानंतर कमळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. पोतदार दाम्पत्याने आपल्यास अटक होऊ नये म्हणून टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांचा अर्ज फेटाळला. गेली पंधरा दिवस अटकेच्या भीतीने हे दाम्पत्य लपून राहत होते. त्यांनी घटना घडल्यापासून सुर्वेनगर व शाहूवाडी तालुक्यातील डिघे शिराळे येथील घर सोडले होते. काल शाहूपुरी पोलिसांनी त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही न्यायालयांनी जामीन अर्ज फेटाळल्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणार होती. त्यामुळे हे दाम्पत्य सकाळी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे करत आहेत. तोंड लपविण्याचा प्रयत्न पोतदार दाम्पत्यास अटक झाल्याचे वृत्त शहरात पसरताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी दाम्पत्य आपला चेहरा लपवून घेत होते तर सदस्या प्रभावती पोतदार यांना आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. या दोघांना इतर आरोपींप्रमाणेच पोलिसांनी वागणूक दिली. पोतदार दाम्पत्यास एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची करवीर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र कोठडी आहे. त्यामध्ये प्रभावती पोतदार एकट्याच रात्रभर तिष्टत बसल्या होत्या. तेथूनच काही अंतरावरील कोठडीमध्ये प्रकाश पोतदार याला ठेवण्यात आले होते. एरव्ही रूबाब मारणार्या या दाम्पत्याने रात्रभर बिन भाड्याच्या खोलीत मुक्काम केला. त्यावेळी त्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी या दोघांनाही अश्रू अनावर झाले. (प्रतिनिधी)