‘गोकुळ’ वगळता इतर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:55+5:302021-02-23T04:36:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने ‘गोकुळ’ वगळता जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याच्या ...

‘गोकुळ’ वगळता इतर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने ‘गोकुळ’ वगळता जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यातील १००२ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, त्यांची अंतिम याद्या करून स्थगिती देण्याबाबत सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने ‘गोकुळ’ यातून वगळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुका घ्यायच्या म्हटल्या,तर गर्दी होऊ शकते, त्यातून संसर्ग वाढण्याची भीती असल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ची निवडणूक होत आहे. त्यामुळे त्याला स्थगिती देता येत नाही. उर्वरित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर संस्थांची प्रक्रिया सुरू आहे. त्यांची अंतिम यादी झाल्यानंतर स्थगिती द्यावी, असा एक मतप्रवाह आहे. मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर ‘कट ऑफ डेट’च्या कायदेशीर अडचणी येत नाहीत. त्याचा विचार करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
‘मुश्रीफ- पी. एन.’ भेट सोमवारी
‘गोकुळ’च्या निवडणुकीबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार असल्याचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले होते. मात्र अद्याप भेट झालेली नाही. सोमवार (दि. १) पासून विधिमंडळाचे अधिवेशन होत असून, त्याचवेळी चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक प्रशिक्षणही लांबणीवर
सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण, आज मंगळवारी होते; मात्र कोरोनामुळे निवडणूक प्राधिकरणाने ते पुढे ढकलले आहे.
दृष्टिक्षेपात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था -
वर्ग संस्थांची संख्या
‘अ’ १०
‘ब’ २२२
‘क’ १७६
‘ड’ ५९४