अंगणवाडी सेविकांचा मोर्चा स्थगित
By Admin | Updated: May 23, 2015 00:29 IST2015-05-22T23:54:45+5:302015-05-23T00:29:00+5:30
पोलिसांची तीन तास धावपळ : पंकजा मुंडे उद्या भेटणार; आंदोलनाबाबत पोलिसांची दडपशाही : दिघे

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा स्थगित
कोल्हापूर : मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ भाजप अधिवेशनावर काढण्यात येणारा अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचा मोर्चा थांबविण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या पातळीवर शुक्रवारी सकाळी तीन तास घडामोडी झाल्या. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता चर्चा करणार आहेत, असे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर राज्य पूर्वप्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाने मोर्चा स्थगित केला.
मानधनाऐवजी वेतन मिळावे, आठ महिन्यांचे थकीत मानधन मिळावे, आदी मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महासंघातर्फे भाजपच्या राज्य अधिवेशनावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चासाठी लक्ष्मीपुरीतील श्रमिक कार्यालयात अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. हा मोर्चा थांबविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न झाले. ‘श्रमिक’च्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
पोलिसांनी लाल निशाण पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल दिघे, महासंघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, मंत्री मुंडे यांनी चर्चेसाठी वेळ द्यावा, या मागणीवर दिघे आणि तळेकर हे ठाम राहिले. त्याची माहिती पोलिसांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार यांनी उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता मंत्री मुंडे चर्चा करणार असल्याचे लेखी पत्र दुपारी एकच्या सुमारास दिघे व तळेकर यांना दिले. त्यानंतर मोर्चा स्थगित केला.
या मोर्चासाठी कोल्हापूर, सांगली व सातारा येथून सुमारे दीड हजार अंगणवाडी कर्मचारी, सेविका आल्या होत्या. दरम्यान, आम्ही लोकशाही पद्धतीने आयोजित केलेला मोर्चा थांबविण्यासाठी पोलिसांनी प्रथम दडपशाही केली. त्यांनी ‘श्रमिक’च्या सभोवती पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. पण, त्याला आम्ही बळी पडत नसल्याचे पाहून त्यांनी विनंती सुरू केली. साताऱ्यातील आमचे नेते शौकतभाई पठाण यांना चौकशीसाठी साताऱ्यातील पोलीस ठाण्यात थांबविले. मोर्चाबाबतचे पत्र कोल्हापुरातून साताऱ्यातील पोलीस ठाण्यात फॅक्स केले. त्यानंतर कोल्हापूरला येणाऱ्या पठाण यांच्यासमवेत एक पोलीस देण्यात आला. मोर्चा स्थगितीसाठी झालेल्या दडपशाहीबाबत पोलीस व मंत्रिमंडळाचा आम्ही निषेध करतो, असे अतुल दिघे यांनी सांगितले. ते म्हणाले, चर्चा करतो असे सांगून तीनवेळा मंत्री मुंडे यांनी आम्हांला हुलकावणी दिली आहे. यावेळी तसे झाल्यास त्याबाबत जिल्हा भाजपला आम्ही जाब विचारणार आहोत. (प्रतिनिधी)
पोलिसांनी जंग-जंग पछाडले
आम्ही मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांनी जंग-जंग पछाडले. मोर्चा स्थगित करण्यासाठी अखेर मंत्री मुंडे यांच्याशी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील महासंघाच्या शिष्टमंडळाशी भेट निश्चित केल्याचे पत्र पोलिसांना आणून द्यावे लागल्याचे महासंघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, यापूर्वी मंत्री मुंडे यांनी तीन वेळा गुंगारा दिला आहे. आता असे खपणार नाही. अडीच लाख अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांना आठ महिने मानधन नाही. ५० लाख लाभार्थ्यांच्या पोषण आहाराचा अनेक महिने पत्ता नाही. त्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीच्या ठिकाणी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.