पोस्टाचीही कोअर बँकिंग प्रणाली
By Admin | Updated: September 10, 2014 23:48 IST2014-09-10T23:47:20+5:302014-09-10T23:48:49+5:30
९८ शाखा : खातेदारांना अधिक सुविधा

पोस्टाचीही कोअर बँकिंग प्रणाली
कोल्हापूर : विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या पोस्टाच्यावतीने कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे खातेधारकांना बँकांप्रमाणेच पोस्टाच्या देशभरातील कोणत्याही खात्यात व्यवहार करता येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टाच्या एकूण ९८ शाखा असून, शहरात ही सेवा येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे.
सुरक्षित बचतीचा विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाकडे पाहिले जाते. अन्य कोणत्याही प्रकारच्या बचतीच्या पर्यायांपेक्षा व गुंतवणुकीपेक्षा पोस्टातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आजही बहुतांश नागरिक पोस्टातील बचत खात्याला प्राधान्य देतात. पोस्टाच्यावतीने बचतीसह रिकरिंग, ठेव अशा विविध योजना ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
मात्र, पोस्टात जाणे, पैसे भरणे, काढणे किंवा अन्य कागदोपत्री व्यवहारांची पूर्तता करणे हा प्रकार तसा वेळखाऊ आणि काही अंशी किचकट. आता मात्र पोस्टाचे हे रूपडे पालटणार आहे. कोल्हापुरातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये येत्या दोन महिन्यांत कोअर बँकिंग प्रणाली सुरू होत आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना बँकांप्रमाणे सोयीसुविधा मिळणार असून, खातेदारांना देशातील कोणत्याही खात्यात आपले व्यवहार करता येतील. तसेच ग्राहकांना एटीएम कार्डदेखील देण्यात येईल. यामुळे पैसे काढणे अधिक सुलभ होणार आहे.
कोल्हापूर शहरात पोस्टाच्या १६ शाखा आहेत. शहर व जिल्हा मिळून एकूण ९८ शाखा आहेत. शहरात येत्या दोन महिन्यांत ही सेवा सुरू होईल. जिल्ह्यात मात्र १५ जून २०१५ पर्यंतही सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती सब-पोस्टमास्तर सुरेश मगदूम यांनी दिली.
बॅलन्स तपासून घ्या...
कोअर बँकिंग प्रणाली सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी आपल्या खात्यावरील बॅलन्स तपासून घ्यावा व त्याची नोंद आपल्या पासबुकामध्ये करून घ्यावी, असे आवाहन पोस्टाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरात येत्या दोन महिन्यांत आणि जिल्ह्यात १५ जून २०१५ पर्यंत पोस्टाच्या सर्व शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली सुरू होईल. तत्पूर्वी सर्व खातेदारांनी आपला बॅलन्स तपासून पाहणे गरजेचे आहे. नंतर त्यात काही दोष निघाला तर नोंद झालेल्या रकमेत बदल करता येणार नाही.
- सुरेश मगदूम
(सब-पोस्टमास्तर)