कोल्हापुरात नोटा बदलण्यास पोस्ट आॅफिसमध्ये गर्दी

By Admin | Updated: November 11, 2016 00:54 IST2016-11-11T00:57:25+5:302016-11-11T00:54:19+5:30

विद्यार्थ्यांचेही हाल : देण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांची निराशा, ग्रामीण भागातही बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा

Post office shifts in Kolhapur to change currency | कोल्हापुरात नोटा बदलण्यास पोस्ट आॅफिसमध्ये गर्दी

कोल्हापुरात नोटा बदलण्यास पोस्ट आॅफिसमध्ये गर्दी

कोल्हापूर : सरकारने ५00 व १000 रुपयांच्या चलनी नोटा मंगळवार (दि. ८) पासून व्यवहारातून बाद केल्यानंतर गुरुवारी त्या बदलून घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच पोस्ट कार्यालयात गर्दी केली होती; परंतु त्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने अनेकांची निराशा झाली.
रमणमळा येथील प्रधान पोस्ट कार्यालयात सकाळी नऊ वाजल्यांपासूनच ग्राहकांनी नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी केली होती. पैसे भरून घेणे व पैसे बदलून घेणे अशा दोन वेगवेगळ्या रांगा करण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली होती; परंतु बदलून देण्यासाठी शंभराच्या नोटाच नसल्याने रांगा पोस्ट आॅफिसच्या फाटकाच्या बाहेरपर्यंत आल्या होत्या.
नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. कार्यालयात देण्यात येणारे अर्ज इंग्रजी भाषेत असल्याने त्यांना अडचणींचा सामना क रावा लागला. ज्यांना इंग्रजी लिहिता वाचता येते त्यांना अर्ज भरून देण्याची ते विनवणी करीत होते. सुरुवातीला तासाभरात पैसे येतील, असे त्यांना सांगण्यात येत होते; परंतु सकाळपासून ताटकळत उभे असलेल्या अनेक ांनी नोटा जमा करून घरी जाणे पसंत केले. ट्रेझरी आॅफिसकडून दुपारी एकच्या सुमारास नोटा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना नोटा बदलून देण्यास सुरुवात झाली.
नागरिकांजवळ पैसे नसल्याने व ५00, १000 च्या नोटा मॉल, बझारमध्ये स्वीकारत नसल्याने मॉलमध्ये शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसत होते. बॅँकेच्या खात्यावर, डेबिट कार्ड, के्रडिट कार्डवर रक्कम असणाऱ्यांनी मात्र डी-मार्ट, बिग बझार, स्टार बझार, शॉपर्स स्टॉप, लकी बझार, आदी ठिकाणी दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले.
शिवाजी विद्यापीठ परिसरात सांगली, सोलापूर, सांगोला, जत, आटपाडी, सातारा, आदी भागांतील विद्यार्थी शिक्षण, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. नुकतीच दिवाळीची सुटी संपल्याने घरातून येताना मेसचे बिल, रुम भाडे व दैनंदिन गरजांसाठी पैसे आणले होते. त्यामध्ये ५00, १000 रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याने गुरुवारी सकाळीच विद्यापीठ परिसरातील युको बॅँक, प्रतिभानगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत त्या बदलून घेण्यासाठी तत्यांनी गर्दी केली होती; परंतु बॅँक खाते, आधार कार्ड नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी मित्रांच्या खात्यावर पैसे भरणे पसंत केले. तर अनेकांनी पोस्ट आॅफिसकडे धाव घेतली. तसेच ताराबाई पार्क, ताराराणी चौक, नागाळा पार्क परिसरातील बॅँकांच्या विविध शाखांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. बॅँक आॅफ पटियालामध्येही नागरिकांना देण्यासाठी पैसे नसल्याने दुपारी चार नंतर येण्यास सांगण्यात येत होते.
स्टेट बँक, दसरा चौक
दसरा चौक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ५०० व १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी सकाळी आठ वाजल्यांपासून रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला चारच हजार बदलून दिले जात असल्याने अनेकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ही रांग साडेआठच्या सुमारास रस्त्यावर आली. त्यानंतर दुपारपर्यंत रांग वाढतच गेली. बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षा कर्मचारी व पोलिस कर्मचारी मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे या ठिकाणी रांगेत उभे राहण्यावरून किरकोळ वादाचे प्रसंग उद्भवलेही आणि ते तेथेच मिटलेही.
अर्बन बँक, गंगावेश
गंगावेश येथील कोल्हापूर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत गुरुवारी सकाळी आठ वाजल्यांपासूनच पैसे काढण्यासाठी सभासद व खातेदारांनी रांगा लावल्या होत्या. यात प्रत्येक खातेदाराला प्रत्येकी दोन हजार रुपयेच काढण्याची मुभा बँक प्रशासनाने दिली. एकाचवेळी अनेकांना पैसे काढायचे असल्याने बँकेत सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र दिसत होते.
महाराष्ट्र बँक, खरी कॉर्नर
खरी कॉर्नर येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत नोटा बदलून घेण्यासाठी सकाळी आठ वाजल्यांपासून रांगा लागल्या होत्या. नऊच्या सुमारास व्यवहार सुरू झाले. यावेळी प्रत्येकी चार हजारांच्या नोटा बदलून देण्यात आल्या.
आयडीबीआय बँक, न्यू महाद्वार रोड
न्यू महाद्वार रोडवरील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलजवळ असलेल्या आयडीबीआय बँकेत सकाळी साडेसात वाजल्यांपासून रांगा लागल्या होत्या. या रांगा रस्त्यावर आल्याने काहीकाळ वाहतुकीला अडथळा झाला.



कामगारांचे पगार लांबणीवर
नोटा रद्दचा फटका औद्योगिक वसाहतीमधील लहान कारखान्यांमधील कामगारांना बसला आहे. संबंधित कारखानदार हे बँकेतून पैसे आणून ते दर महिन्याच्या साधारणत: १० तारखेपर्यंत कामगारांना देतात. मात्र, नोटा रद्दमुळे यावेळी ते शक्य झाले नाही. याबाबत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांतील कामगारांचे वेतन थेट बँकेत जमा होते, त्यांना या निर्णयाचा काही त्रास झालेला नाही; पण, लहान कारखान्यांतील कामगारांचे पगार लांबणीवर पडणार, हे निश्चित आहे.
रिअल इस्टेटमधील व्यवहार थांबले
जमीन अथवा फ्लॅट खरेदीचे अनेक व्यवहार हे ६० टक्के पांढऱ्या पैशांमध्ये, तर ४० टक्के काळ्या पैशांमध्ये होतात. नोटा रद्दमुळे गेल्या दोन दिवसांपासून या रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहार अनेकांनी थांबविले आहेत. काहींनी निश्चित झालेले व्यवहार हे काही दिवसांसाठी पुढे ढकलले आहेत. दरम्यान, याबाबत ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले की, काहीजणांकडून फ्लॅट, जमीन खरेदी करताना जो काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात येत होता, त्याला केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे चाप बसणार आहे.

सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र, याचा त्रास सर्वसामान्यांना होता कामा नये. सरकारने केवळ चार हजारच पहिल्या टप्प्यात बदलून देण्याचा घेतलेला निर्णय व्यावहारिक नाही. किमान १0 ते २0 हजार रुपये बदलून मिळाले असते तर बरे झाले असते. चार हजार रुपयांसाठी अर्ज वगैरे भरून न घेता थेट बदलून देणे गरजेचे होते. कारण या रांगेतून सर्वसामान्य नागरिकच येत होते.
-समीर शेख, कोल्हापूर.

भाजीपाला विक्रीवर अल्पसा परिणाम
कोल्हापूर : कोल्हापुरातील कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, गंगावेश, टिंबर मार्केट, रेल्वे फाटक, राजारामपुरी मंडई, आदी परिसरांतील भाजी मार्केटमध्ये ५00, १000 च्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. विशेषत: शंभर रुपयेही सुट्टे मागितले जात होते. अनेक नागरिकांनी पैशांचा तुटवडा सोडविण्यासाठी घरातील साठवून ठेवलेल्या ‘पिगी बँका’ फोडल्याचे भाजी विके्रत्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षकांकडून बँकांची पाहणी
कोल्हापूर : ५00 आणि १000 रुपयांच्या चलनी नोटा बदलण्यासाठी गुरुवारी शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात व्यवहार सुरू होते. बँकेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ग्राहक रांगेत उभे राहून सहकार्य करीत होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाने ज्या त्या पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना हद्दीतील बँकांना भेटी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत बँकेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत होते.

दोन हजारांच्या नोटेचे आकर्षण
जुन्या ५०० व १००० च्या नोटा रद्द करून त्याऐवजी नव्या २००० रुपयांच्या नोटा वितरित केल्या जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले होते. २००० रुपयांच्या नव्या नोटेबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे गुरुवारी बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या काहीजणांनी २००० रुपयांची नवी नोट घेण्याला प्राधान्य दिले. ही नोट हातात पडल्यानंतर अनेकांनी तिचे छायाचित्र घेऊन व्हॉट्स अ‍ॅपद्वारे आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पाठविले. दरम्यान, बँक आॅफ इंडियाने दिवसभरात २० कोटी रुपयांचे २००० च्या नोटांचे वितरण केले. कोल्हापूर जिल्ह्णातील शहरासह ग्रामीण भागातील ४४ शाखांमधून २००० रुपयांच्या नव्या नोटांचे ग्राहकांना वितरण केले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत किणिंगे यांनी सांगितले.

कोल्हापुरात आल्या
५०० व २००० च्या अब्जावधीच्या नोटा
कसबा बावडा : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलू देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून कोल्हापुरातील ट्रेझरी शाखांकडे नवीन पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा पाठवून देण्यात आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्जावधी रुपयांच्या या नोटा आहेत. दरम्यान, काही बॅँकांनी पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे आजच वितरण
केले. मात्र तुलनेत शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा अजूनही जाणवत आहे.
नागरी बॅँकांचा व्यवहार वाढला
नागरी बॅँकेतील खातेदारांनी गुरुवारी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा जमा करण्यासाठी तसेच बदलून घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. नेहमीच्या व्यवहारापेक्षा दहापट व्यवहार
झाला.

Web Title: Post office shifts in Kolhapur to change currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.