गर्भलिंग निदान तपासणी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:17+5:302021-07-21T04:18:17+5:30

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणीप्रकरणी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत ...

Possibility of exposing gynecological diagnostic racket | गर्भलिंग निदान तपासणी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

गर्भलिंग निदान तपासणी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणीप्रकरणी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत असून आणखी ५ एजंटांची चौकशी सुरू असून त्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरारी कथित डॉक्टर मुख्य संशयित आरोपी राणी मनोहर कांबळे (वय ३४, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिला करवीर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांना आज, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परिते येथे बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सातजणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले. त्यापैकी पाचजणांना जागीच अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर फरारी असलेली मुख्य संशयित आरोपी राणी कांबळे या महिलेस मंगळवारी सायंकाळी कसबा वाळवे येथून अटक केली.

बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्र परिते येथे साताप्पा खाडे याच्या घरात सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकला. अटक केलेला संशयित बनावट डॉक्टर महेश सुबराव पाटील (रा. सिरसे), घरमालक साताप्पा कृष्णा खाडे (रा. परिते), गर्भलिंग निदानासाठी आणलेल्या महिलेचा पती अनिल भीमराव माळी, एजंट भारत सुकुमार जाधव (दोघेही रा. हुपरी), एजंट सचिन दत्तात्रय घाटगे (रा. क. वाळवे) अशा पाचजणांकडे चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीत एजंटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने पोलीस सखोलपणे तपास करत आहेत.

दीड वर्षापासून केंद्र सुरू

बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी केंद्र हे दीड वर्षापासून सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. सापडलेल्या डायरीत तपासणी करून गेलेल्या महिलांची सांकेतिक भाषेत नावे असून पोलीस त्या महिलांचा शोध घेत आहेत.

सोनोग्राफी मशीन महेश पाटील याच्यानावे

कारवाईत जप्त सोनोग्राफी मशीन हे महेश पाटील याच्यानावे असून तोच कथित डॉक्टर बनून मशीन ऑपरेट करत होता. त्याच्यासह राणी कांबळे हे दोघे केंद्र चालवत असल्याची माहिती करवीरचे सहा. पो. नि. विवेकानंद राळेभात यांनी दिली. राणी कांबळेवर कागलमध्ये २०१७ मध्ये गर्भलिंग चाचणीप्रकरणी गुन्हा दाखल असून ती जामिनावर बाहेर राहून दीड वर्षापासून परितेमध्ये हे केंद्र चालवत होती.

फोटो नं. २००७२०२१-कोल-राणी कांबळे (आरोपी)

Web Title: Possibility of exposing gynecological diagnostic racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.