फसवणूकप्रकरणी उमेश शिंदे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: December 31, 2014 00:36 IST2014-12-31T00:36:05+5:302014-12-31T00:36:05+5:30
बँकेत बनावट खाते उघडून सहा कोटी ८० लाखांची फसवणूक

फसवणूकप्रकरणी उमेश शिंदे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह बँकेत बनावट खाते उघडून सहा कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक उमेश धोंडिराम शिंदे (रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) या संशयिताला आज, मंगळवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिसांनी पुणे येथून कोल्हापुरात आणले असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, शिंदेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी आज ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, १६ डिसेंबर २०१२ रोजी संशयित उमेश शिंदे याच्यावर जुना राजवाडा पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्यापासून तो पसार होता. पोलिसांनी हा तपास व्यवस्थित न केल्याने तो राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला होता. त्यानंतर त्याला सुमारे दोन वर्षांनी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याचा ताबा घेण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस पुण्याला रवाना झाले होते.
पुणे येथील अरविंद कारभारी गागरे (रा. भोसरी) यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा याठिकाणी असलेल्या जोगेश्वरी ब्रेव्हरीज प्रा. लि. कंपनीबरोबर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक उमेश शिंदे याचा डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंगच्या कामासंबंधी करार झाला होता. त्यापोटी गागरे यांना काम पूर्ण झाल्यानंतर १५ कोटी ९३ लाख रुपये देण्याचे ठरले होते. कराराप्रमाणे गागरे यांनी काम पूर्ण केल्यानंतर शिंदे यांच्याकडून ६ कोटी ८० लाख येणे बाकी होते. मात्र, संशयित शिंदेने गागरे यांच्या नावे श्री महालक्ष्मी बँकेत बनावट खाते उघडून श्री समर्थ इंडस्ट्रीजचे अरविंद गागरे या नावे देणे असलेली रक्कम कागदोपत्री देय दाखवून ती रक्कम पुन्हा जोगेश्वरी ब्रेव्हरीजचे चेअरमन शिंदे यांच्या नावावर वर्ग केली होती. गागरे यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत दिली होती.