‘पेर्इंग घोस्ट’, गोष्ट कुटुंबवत्सल भुतांची
By Admin | Updated: May 27, 2015 00:58 IST2015-05-27T00:31:38+5:302015-05-27T00:58:03+5:30
कलाकारांशी गप्पाटप्पा : सखींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे

‘पेर्इंग घोस्ट’, गोष्ट कुटुंबवत्सल भुतांची
कोल्हापूर : एरव्ही भूत म्हटले तरी आपल्यासमोर तारे चमकतात; पण आमच्या चित्रपटातील सगळी भुते कुटुंबवत्सल आहेत. माधव माटेगावकर या तरुणाचे आयुष्य अधिक सुंदर करणारी आहेत. भुतं आणि माणसाच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘अ पेर्इंग घोस्ट’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (दि. २९) प्रदर्शित होत आहे... अशा शब्दांत या चित्रपटाच्या कलाकारांनी ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांशी संवाद साधला.
शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी आयोजित या मुक्त संवादाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून झाले. व्यासपीठावर ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, अभिनेत्री स्पृहा जोशी, शर्वानी पिल्ले, अनिता दाते, अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, कांचन पगारे, समीर चौगुले उपस्थित होते.
स्पृहा जोशी म्हणाल्या, व. पु. काळे यांच्या ‘बदली’ या कथेवर आधारित हा चित्रपट एक प्रेमकथा आहे, ज्याला भुतांचा तडका आहे.
उमेश कामत म्हणाले, माधव माटेगावकर या अत्यंत साध्या, सरळमार्गी असलेल्या मुलाला अनेक लोक छळत असतात. अशा परिस्थितीत भुतांचे कुटुंब त्याच्या मदतीला धावून येते. पुष्कर श्रोत्री व शर्वानी पिल्ले म्हणाल्या, आम्ही दोघं आणि सहा लहान मुली अशा भुतांची भूमिका साकारत आहोत, जी अतिशय कुटुंबवत्सल आहेत, संवेदनशील आहेत. भूत आणि माणसांचे नाते प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कांचन पगारे, समीर चौगुले व अनिता दाते यांनीही चित्रपटाबद्दल माहिती सांगितली.
यावेळी स्पृहा जोशी यांनी ‘आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरूण’ ही कविता सादर केली. त्यानंतर कलाकारांनी सखींनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. तत्पूर्वी सखींनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.
स्नेहा सारडा ‘बॉलिवूड ब्युटी...’
सखी सदस्यांसाठी ‘बॉलिवूड ब्युटी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सखींनी हेमामालिनीपासून जया भादुरी, प्रियांका चोप्रा, म्हाळसादेवी अशा विविध वेशभूषा साकारल्या. या स्पर्धेत स्नेहा सारडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वनिता बक्षी व अमरजा नाझरे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकांचे पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून मनीषा रानमाळे यांनी काम पाहिले.