‘पॉप्युलर’चे भागीदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
By Admin | Updated: March 16, 2015 00:43 IST2015-03-16T00:43:32+5:302015-03-16T00:43:43+5:30
जाधव यांनी शेती औजारांचे ज्ञान आत्मसात केले आणि १९९० मध्ये शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये पॉप्युलर फौंडर्स या नावाने कंपनी सुरू केली.

‘पॉप्युलर’चे भागीदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
शिरोली : कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योगपती आणि पॉप्युलर उद्योग समूहाचे भागीदार चंद्रकांत केशवराव जाधव यांचे रविवारी अल्पशा आजाराने रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. शेती औजार उद्योगात त्यांचे मोलाचे योगदान होते.
पॉप्युलर उद्योग समूहाचे संस्थापक केशवराव जाधव यांनी ५० वर्षांपूर्वी उद्यमनगर येथे उद्योग सुरू केला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रकांत जाधव यांनी शेती औजारांचे ज्ञान आत्मसात केले आणि १९९० मध्ये शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये पॉप्युलर फौंडर्स या नावाने कंपनी सुरू केली. अजित आणि रणजित या दोन्ही मुलांच्या सहकार्याने पुढे २००४ मध्ये पॉप्युलर अॅग्रीकल्चरल इम्प्लिमेंट, तर २००६ मध्ये भूमी अॅग्रीकल्चरल इम्प्लिमेंट ही युनिट सुरू केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, सोमवारी सकाळी आहे. (वार्ताहर)