पोपटराव पवार : कृषी उत्सवात आव्हान; तर आत्महत्या बंद होतील

By Admin | Updated: January 21, 2015 00:31 IST2015-01-21T00:27:51+5:302015-01-21T00:31:14+5:30

पॅकेज बंद करा; हमीभाव द्या

Popatrao Pawar: Challenge in Agriculture Celebration; If suicide will stop | पोपटराव पवार : कृषी उत्सवात आव्हान; तर आत्महत्या बंद होतील

पोपटराव पवार : कृषी उत्सवात आव्हान; तर आत्महत्या बंद होतील

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देण्यात येणारी पॅकेजीस बंद करून त्यांच्या शेतीमालाला हमीभाव दिल्यास शेती किफायतशीर होईल व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआप बंद होतील, याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे आवाहन आदर्श ग्राम योजना प्रकल्पाचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी केले. श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या ‘कृषी उत्सव’च्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. पवार म्हणाले, स्वामीजींनी उभारलेला हा लोकोत्सव देशाला आदर्शवत असून येथील संदेश घेऊन शेतकरी आपले जीवनमान निश्चितच उंचावतील. आजपर्यंत अनेक कृषी मेळावे पाहिले; पण हा आगळावेगळा मेळावा आहे. येथे प्रात्यक्षिक आहे, बिघडलेल्या गावाबरोबर मॉडेल गावाची उभारणीही त्यांनी केलेली आहे. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे जाण्यास सांगितले होते, त्यांच्या संकल्पनेत गावसभेला महत्त्व होते; पण आता ७० टक्के गावसभा या कागदावरच होतात. ग्रामपंचायत हे विकासाचे मंदिर असते; पण राजकारणाने मंदिराचे तुकडे होताना आपण पाहतो, अशी खंत व्यक्त केली. योजना चांगल्या आहेत; पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. या योजनेत हात मारणाऱ्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असेही ते म्हणाले.
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या कार्याचे कौतुक करीत खासदार सुरेश अंगडी म्हणाले, आजचे तरुण शेती सोडून सरकारी नोकरीच्या मागे लागले आहेत. त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असून, अशा प्रकारचा कृषी उत्सव निश्चितच तरुणांमध्ये शेतीची गोडी निर्माण करील. सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनल्याचे सांगत ‘अग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे शेती उत्पन्नवाढीचे शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. रासायनिक खतांचा मारा करीत उत्पन्न वाढले; पण जमिनीचा पोत ढासळला आहे. यासाठी सेंद्रिय शेती गरजेची आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू किसन लवांडे, एस. बी. दंडीन, महेश शर्मा, माजी केंद्रीय राज्यमंत्री बसनगौडा पाटील, माजी आमदार सा. रे. पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात राजश्री चौधरी, आदी उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशीही गर्दीचा उच्चांक
महोत्सवाला आज, दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर शेती, त्यातील आधुनिक तंत्रज्ञान व नवनवे प्रयोग यांची माहिती उपस्थित वक्त्यांनी दिली. देशभरातून विविध राज्यांमधील श्री काडसिद्धेश्वर महाराजांचे भक्त आले होते. त्याचबरोबर उत्सवस्थळी आलेल्या पाहुण्यांसाठी उत्कृष्ट बैठक व्यवस्था केली होती. प्रशस्त मंडप व अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने लाखो लोकांची उपस्थिती असतानाही कोठेही विस्कळीतपणा दिसला नाही.

लखपती शेती :
सर्वांचे आकर्षण
या संस्कृती उत्सवाने सर्वांना भुरळ पाडली आहे. दुसऱ्या दिवशी कमालीची गर्दी होती; पण यामध्ये सर्वांचे आकर्षण ठरले ते लखपती शेती. दिवसभर ही शेती पाहण्यासाठी लोटच्या लोट तिकडे जात होते.

संस्कृती उत्सवात आज
सकाळी आठ वाजता : वारकरी उत्सवांतर्गत व्यासपीठ, ग्रंथ, वीणा पूजनाने प्रारंभ
सकाळी नऊ वाजता : ज्ञानेश्वरीचे पारायण
सकाळी साडेअकरा वाजता : परिसंवादाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते, विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
देशी गाई, बैल यांचे प्रदर्शन व स्पर्धा तसेच शंभर जातींच्या देशी श्वानांचे प्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे.
दुपारी तीन वाजता : स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी व माऊली अश्वरिंगण सोहळा होईल.
सायंकाळी साडेसात वाजता : हरिकीर्तन


पारंपरिक नृत्याविष्कार
उत्सवात आजची सायंकाळ पारंपरिक नृत्याविष्काराने रंगली. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आदींसह देशाच्या अन्य भागांतून आलेल्या १९ संघ सहभागी झाले होते.

Web Title: Popatrao Pawar: Challenge in Agriculture Celebration; If suicide will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.