मुरगूड एस.टी.स्थानकाचे रूप पालटणार

By Admin | Updated: October 19, 2015 23:56 IST2015-10-19T23:33:54+5:302015-10-19T23:56:04+5:30

४0 लाखांचा निधी : रंगरंगोटीसह हायमॅक्स दिवे लागणार; दिवाळीनंतर डांबरीकरण

Poor grass stalls will change | मुरगूड एस.टी.स्थानकाचे रूप पालटणार

मुरगूड एस.टी.स्थानकाचे रूप पालटणार

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील एस. टी. बसस्थानकाच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्राप्त निधीतून स्थानक परिसरातील विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी पूर्ण होणार असून, परिसरात दोन हायमॅक्स सोडियम दिवे बसविणार आहेत. सुशोभीकरणाची सर्व कामे झाल्यानंतर परिसराचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
मुरगूड बसस्थानकाकडे शासनाने व महामंडळाने दुर्लक्ष केल्याने ते समस्यांचे आगार बनले होते. त्या संदर्भात ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसराची डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. परिसरात मोठमोठे खड्डे पडले असल्याने या किरकोळ डागडुजीने काहीच होणार नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष दगडू शेणवी, समाजवादीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शहा, किशोर पोतदार, दलितमित्र डी. डी. चौगले, विरोधी पक्षनेता किरण गवाणकर, संजय घोडके, दत्ता कदम, समाधान पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शहरामध्ये एस.टी.ला प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील, मुख्य नियंत्रक सुहास जाधव, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन युद्ध पातळीवर मॉडेल बसस्थानक करण्याच्या दृष्टीने ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने पहिल्या टप्प्यातील ४० लाखांच्या निधीला मंजुरी
दिली. त्यातून बसस्थानकातील विकासकामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पास वितरणासाठी स्वतंत्र विभाग, छत, आदी कामे पूर्ण झाली आहेत. सध्या संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. (वार्ताहर)

सर्व कामावर नागरिकांचा ‘वॉच’
शासकीय काम म्हणजे ढपला संस्कृती अशाच पद्धतीची मानसिकता समाजाची झाली आहे; पण लोकांच्या आंदोलनामुळे मुरगूडच्या एस. टी. स्थानकाला लाखो रुपयांचा निधी मिळाला असल्याने होणाऱ्या प्रत्येक कामावर नागरिक वॉच ठेवून आहेत. जर कामामध्ये काळेबेरे दिसले, तर लागलीच त्याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष आणि सानिका स्पोर्टस्चे संस्थापक दगडू शेणवी यांनी दिला आहे.

प्रवेशद्वारामध्ये उच्च क्षमतेचे सोडियमचे दिवे
बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांमध्ये उच्च क्षमतेचे हायमॅक्स सोडियमचे दिवे बसविण्याचे काम सुरू होणार आहे. बसस्थानकाची संपूर्ण इमारत दिवाळीपूर्वी रंगविण्यात येणार आहे.
दिवाळीनंतर संपूर्ण परिसराचे डांबरीकरण टेंडर नोटीस निघून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. जुन्या इमारतीच्या रिकाम्या जागेमध्येही दुकानगाळे बांधण्यात येणार आहेत. याबाबतची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, आदी कामे सुरू आहेत.

Web Title: Poor grass stalls will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.