प्रदूषणप्रश्नी दिल्लीपर्यंत धडक
By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-18T23:40:55+5:302014-12-19T00:12:42+5:30
एक वर्षे अभ्यास, सर्व्हे करून प्रदूषण रोखण्यासाठी निधीसाठी केंद्रापर्यंत मजल मारणारी राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद

प्रदूषणप्रश्नी दिल्लीपर्यंत धडक
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतर्फे सरत्या वर्षात अतिशय संवेदनशील अशा पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी तब्बल १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले. एक वर्षे अभ्यास, सर्व्हे करून प्रदूषण रोखण्यासाठी निधीसाठी केंद्रापर्यंत मजल मारणारी राज्यातील या वर्षातील ही पहिली जिल्हा परिषद असावी.
नदीकाठावरील ३८ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. तज्ज्ञ कमिटीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १० जानेवारी २०१३ ला सर्वेक्षणाचे काम सुरू केले. उपाय योजनेचा प्रकल्प अहवाल वर्षात तयार करून पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे दिले. दुरुस्ती करून तेथून १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडून निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘कायापालट’ उपक्रमातून लोकसहभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलला; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत वर्षापासून अनेक आरोग्य केंद्र राहिली. संपूर्ण वर्षात सर्व आरोग्य केंद्रात डॉक्टर देण्यात जिल्हा परिषदेला अपयश आले. जिल्हा परिषदेने प्लास्टिक मुक्ती अभियान प्रभावीपणे राबविले. कापडी पिशव्या वापरण्याची सवय कर्मचाऱ्यांना लागली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सकारात्मक पाऊल टाकले. गुणवत्ता वाढावी यासाठी एक दिवस शाळा भेट कार्यक्रम राबविला. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह राहावा, यासाठी नवचैतन्य शिबिर घेण्यात आले.
शिंगणापुरातील निवासी क्रीडा प्रशालेला ऊर्जितावस्था आणली. अपंग विद्यार्थ्यांसाठी डे केअर सेंटर सुरू केले. शिक्षक संघटनेने न्यायालयात जाऊन समायोजनच्या प्रक्रियेला स्थगिती मिळवत आडकाठी आणली होती; मात्र जिद्दीने प्रशासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडत स्थगिती उठवून त्या संघटनेला चांगली चपराक दिली. शिक्षक संघटनेच्या दबावाला बळी न पडता शासनाच्या जीआरनुसार मुख्यालयात राहण्याच्या सक्तीचा आदेश काढण्याचे ‘धाडस’ केले. प्रशासनाला शिस्त आणण्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना चांगलाच दणका दिला.
सदस्यांना संधी
यंदा सदस्य अमल महाडिक यांना आमदार होण्याचे भाग्य मिळाले. नऊवारी साडीतील विमल पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या. लोकसभा निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे संजय मंडलिक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उमेश आपटे यांना अध्यक्षपद मिळाले.
भीमगोंडा देसाई