प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शून्य
By Admin | Updated: January 19, 2015 00:49 IST2015-01-19T00:47:03+5:302015-01-19T00:49:25+5:30
पंचगंगा प्रदूषण : तीव्र आंदोलनानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ सुस्तच; आरोग्याचा प्रश्न गंभीर

प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शून्य
गणपती कोळी - कुरुंदवाड\पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होत असल्याने शुक्रवारी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलन झाले, अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, आश्वासने दिली, दूषित पाणी वाहून जाण्यासाठी बंधाऱ्याचे बरगे काढण्याचाही निर्णय झाला; मात्र दोन दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई नाही.
माशांचे मरण मात्र अद्यापही चालूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या बागडी समाजावरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे आंदोलकर्त्यांनी तीव्र आंदोलन करूनही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर कोणताही परिणाम न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, पंचगंगा प्रदूषण प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदीवरील शिरोळचा बंधारा शेवटचा असला तरी तेरवाड बंधाऱ्यावर पाणी तटवून तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाला असल्याने रूई, चंदूर, कबनूर, इचलकरंजी शहरांतील सांडपाण्याबरोबर औद्योगिकरणाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने पाणी स्वच्छ करणारे जलचर प्राणी (मासे) तडफडून मृत होत आहेत. तेरवाड बंधाऱ्याला तटून पाण्यामध्ये माशांचा थर लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे (शिरढोण), महेश पाटील (सैनिक टाकळी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत नदी प्रदूषणाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे यांना जबाबदार धरत त्यांना मृत माशांचा हार घालत दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत आपल्या भावना तीव्र केल्या.
अद्यापही दूषित पाण्याचा प्रवाह नदीत चालू असल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठी उग्र वास येत असून, तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच तेरवाड बंधाऱ्यावर तालुक्यातील बागडी समाज मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.
मात्र, मासेच मृत होत असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तीव्र करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र, याचे गांभीर्य प्रदूषण नियंत्रण मंडळानी न घेता आपल्या कार्यप्रणालीवर कोणतेही परिणाम न झाल्याचे दाखविल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.