प्रदूषणप्रश्नी पंचगंगेचे पाणी ‘पेटणार’
By Admin | Updated: March 9, 2015 23:52 IST2015-03-09T20:45:28+5:302015-03-09T23:52:43+5:30
जनआंदोलनाची तयारी : प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना करण्याची मागणी, शिरोळ तालुक्यात भडका उडण्याची शक्यता

प्रदूषणप्रश्नी पंचगंगेचे पाणी ‘पेटणार’
गणपती कोळी- कुरुंदवाड -पंचगंगा नदी प्रदूषणाची शिरोळ तालुक्यासाठी सर्वांत मोठी समस्या आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील जनतेला यातना भोगाव्या लागत आहेत. याविरोधात विविध संघटनांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. न्यायालयीन लढाईही चालू आहे; मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अद्यापही गंभीर झालेले दिसत नाही. जनआंदोलनाचा रेटा वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळीच दखल घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा चंदगडच्या ‘एव्हीएच’प्रमाणे शुद्ध पाण्यासाठी भडका उडण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदीतून शिरोळ तालुक्यातील २२ गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या काठावर वाढलेले औद्योगिकीकरण व या औद्योगिकीकरणाचे नदीपात्रात सोडले जाणारे रसायनयुक्त सांडपाणी, कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंतच्या शहरांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे. नदी प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समिती, यांच्या माध्यमातून आप्पा पाटील, विश्वास बालिघाटे, डी. जी. काळे, बंडू कुलकर्णी, विजय भोजे, सुरेश सासणे, छत्रपती ताराराणी आघाडीचे प्रसाद धर्माधिकारी, इचलकरंजी परिसर विकास संघाचे धनंजय खोंद्रे, अशा विविध संघटना प्रदूषणविरोधी आंदोलन करीत आहेत.
आंदोलनकाळात पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुजबी कारवाई करून पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रात पाणी सोडून वेळ मारून नेण्याचा प्रकार अधिकारी वर्गातून केला जात आहे. पाणी प्रदूषणाची भीषणता उन्हाळ्यात अधिक जाणवत असते; मात्र अधिकाऱ्यांची आंदोलनकाळापुरतीच कारवाई होत असल्याने आंदोलनकर्तेही दमले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अनेकजण या विषयापासून दूर गेले अन् आंदोलन थंडावले. याचा परिणाम नदी प्रदूषण वाढण्यात झाला. याची तीव्रता वाढल्याने गेल्या दोन वर्षापासून स्वाभिमानी युवा आघाडीच्यावतीने बंडू पाटील, बंडू बरगाले, विश्वास बालिघाटे, आदींनी पुढाकार घेऊन आंदोलन सुरू ठेवले आहे; तर मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यधील सुतार यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढाईही सुरू आहे. आंदोलनकर्त्यांकडून अधिकाऱ्यांना मृत माशांचा हार घालणे, दूषित पाणी पाजविणे, घेराव घालणे, असे प्रकार करून नागरिकांच्या संतप्त भावना उमटत असल्या तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने नदी प्रदूषण वाढतच आहे.
या आंदोलनात जनतेचा सहभाग वाढवून मोठे जनआंदोलन छेडण्यासाठी स्वाभिमानी युवा आघाडीच्यावतीने प्रदूषित पट्ट्यातील गावात नागरिकांत जनजागृती करून आंदोलनात सहभागी करून घेतले जात आहे. त्यांच्या या मोहिमेला गावागावातून प्रतिसादही मिळत आहे. पाणी प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत असल्याने भविष्यात शुद्ध पाण्यावरून चंदगडच्या ‘एव्हीएच’ विरोधाप्रमाणे या तालुक्यातूनही भडका उडण्याची शक्यता आहे.