प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई फार्सच !
By Admin | Updated: March 12, 2015 00:10 IST2015-03-11T22:15:00+5:302015-03-12T00:10:46+5:30
साखर कारखानदारीतून तीव्र संताप : नदी प्रदूषणाचे नियम पाळण्याबाबत अनास्था दाखविणारे अन्य घटकांवर कारवाईच नाही

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई फार्सच !
प्रकाश पाटील - कोपार्डे -नदी व तत्सम स्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांवर त्यांनी नदीतील प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी केलेल्या सर्व उपाय योजनेनंतरही कारवाई केली गेली, ही केवळ साखर कारखान्यांनी दिलेल्या बँकहमीच्या रकमेवर डोळा ठेवून व नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य अस्थापनेला वाचविण्यासाठी केलेली खेळी असल्याच्या प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त होत आहेत.गेल्या काही वर्षांपासून नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने अनेक गावात गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या साथीच्या रोगांची लागण होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र यातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकापर्यंत प्रदूषण मंडळ न पोहोचता ज्याच्यावर सहज कारवाई करता येईल अशा उद्योगांना वेठीला धरून आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.
सध्या साखर कारखान्यांचे हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये वापर होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळेच प्रदूषण झाल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला असला तरी या दहापैकी केवळ ‘दत्त दालमिया आसुर्ले-पोर्ले या कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीला मिळाल्याची नोंद प्रमुख विभागाकडे २०१३-१४ च्या हंगामातील आहे.
इतर नऊ कारखान्यांच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सर्व नियम व अटींची पूर्तता केल्याची व पाणी वापरानंतर ते शेती सिंचनासाठी वापरले जात आहे. याचे दाखले वेळोवेळी दिले आहेत. मात्र, नदी प्रदूषणाबाबत सध्या जनतेच्या रोषाला या विभागाचे अधिकारी बळी पडत आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी हा खटाटोप असून कारखान्यांचे पैसे बँक हमीद्वारे हातात असल्याने सहज कारवाईला मूर्त स्वरुप देता येत असल्यानेच साखर कारखान्यांवरील कारवाई केली जात असल्याचे मत साखर उद्योगातील जबाबदार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
मुळात भोगावतीचे पाणी नदीपर्यंत पोहोचतच नाही. साखर उद्योग हा माणसांचा विशेषत: ग्रामीण जनतेला जगवणारा उद्योग आहे. प्रदूषण मंडळाचे सर्व नियम व अटी पाळण्यासाठी सर्व कारखानदार आटोकाट प्रयत्न करतात, पण कारवाई कोणत्या निकषावर होते हे प्रदूषण मंडळालाच माहीत आहे.
- धैर्यशील पाटील, अध्यक्ष, भोगावती कारखाना
कुंभीचे पाणी प्रदूषण रोखणारे प्रदूषण मंडळाचे सर्व प्रकल्प उभा केले आहेत. प्रदूषण मंडळाने कुंभी-कासारीचे पाणी नदीत मिसळून प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. बऱ्याच वेळा त्याबाबत तपासण्याही या विभागाकडून झाल्या आहेत. मात्र तरीही बँक हमी जप्तीची कारवाई न समजण्यासारखी आहे. - अरुण जाधव, पर्यावरण इंजिनियर
महानगरपालिकेचे दररोज ७५ दशलक्ष घन मीटर सांडपाणी जयंती नाल्याद्वारे सरळ नदीत मिसळत आहे. या पाण्याच्या ५० टक्के पाण्यावरही प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया केली जात नाही. हे पाणी सरळ नदीत मिसळत असताना प्रदूषण मंडळाचे लक्ष कोठे आहे? एवढेच नाही तर नदीकाठच्या गावांचे लाखो लिटर पाणी या गावाकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सरळ नदीत मिसळत असल्याचे प्रदूषण मंडळाकडे नोंदी असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.