सहकारी संस्थांसाठी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान
By Admin | Updated: November 8, 2014 00:23 IST2014-11-08T00:05:19+5:302014-11-08T00:23:11+5:30
सहकार आयोगाची चाचपणी : ‘गोकुळ’, जिल्हा बँकेवेळी वापर शक्य

सहकारी संस्थांसाठी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान
प्रवीण देसाई -- कोल्हापूर -मतदान प्रक्रिया सुलभ व अचूक होण्याठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर झाला पाहिजे, असे मत जिल्हा निवडणूक विभागाने राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे व्यक्त केले आहे. मतदान, मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि मनुष्यबळाचा विचार करता या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करता येऊ शकतो का? याची चाचपणी आयोगाकडून सुरू आहे. याचा विचार झालाच तर आगामी ‘गोकुळ’सह जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत या प्रणालीचा वापर होऊ शकतो.
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राबविलेल्या चांगल्या यंत्रणेमुळे कोल्हापूरला राज्यात अव्वल स्थान मिळाले आहे. यामध्ये जिल्हा निवडणूक विभागाला केंद्र सरकारकडून पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले आहे. हेच अग्रस्थान कायम टिकवून ठेवून कोल्हापूरला आणखी पुढे नेण्यासाठी निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम मशीनचा वापर व्हावा, ज्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया अचूक व वेळेत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत जिल्हा निवडणूक विभागाने राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे व्यक्त केले आहे. त्यामुळे याबाबत चाचपणी सुरू आहे.
निवडणूक आयोगाकडून याचा विचार होऊन ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यास, आगामी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)सह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक (केडीसीसी), कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, बिद्री सहकारी साखर कारखाना, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, राजाराम सहकारी साखर कारखाना, आदी मोठ्या सहकारी संस्थांमध्ये याचा वापर निश्चितपणे केला जाऊ शकतो.
मतपत्रिका (बॅलेट पेपर) मुळे मते बाद होण्याचे मोठे प्रमाण, मतमोजणीसाठी लागणारा प्रचंड वेळ आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ यांमुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया लांबते हे सर्वश्रुत आहे. ज्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर होतो, त्यामध्ये काही मते ही बाद होतातच, हा इतिहास आहे. एकही मत बाद न होता त्या मतदाराचा हक्क हा त्याला मिळालाच पाहिजे, या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ज्या-ज्या वेळी मतदानासाठी ‘ईव्हीएम’चा वापर झाला, त्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शन झाल्या असून, त्यांचे चांगले परिणाम या निवडणुकांमध्ये अनुभवायला मिळाले.
मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वापर शक्य
जिल्हा निवडणूक विभागाकडून मत व्यक्त
राज्य सहकार निवडणूक आयोगाकडून चाचपणी