‘कुंभी’साठी २७ डिसेंबरला मतदान

By Admin | Updated: November 21, 2015 00:39 IST2015-11-21T00:33:06+5:302015-11-21T00:39:32+5:30

राजकीय घडामोडींना वेग : सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Polling for 'Kumbhi' on 27th December | ‘कुंभी’साठी २७ डिसेंबरला मतदान

‘कुंभी’साठी २७ डिसेंबरला मतदान

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यासाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली असून सोमवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून ३० नोव्हेंबरला छाननी होणार आहे; तर १५ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. ‘कुंभी’ची निवडणूक जाहीर झाल्याने करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपलेली आहे; पण राज्य सरकारने या ना त्या कारणाने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकली होती. विरोधी आघाडीने निवडणुकीचा रेटा लावल्यानंतर मे-जून महिन्यांत मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १९ जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच निवडणूक होईल, असे अपेक्षित होते; पण सत्तारूढ गटाने पावसाळ्याचे दिवस असल्याने निवडणुकीला स्थगिती मिळविली होती. राज्य सरकारने राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका आॅक्टोबरपर्यंत स्थगित केल्या होत्या. स्थगिती संपून २० दिवस झाले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नसल्याने प्रमुख राजकीय मंडळी संपर्कात होती. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठविला होता. त्याला गुरुवारी मंजुरी मिळाली. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
‘कुंभी’च्या राजकारणात नरके यांच्याविरोधात राजर्षी शाहू आघाडी असाच सामना रंगला आहे. मध्यंतरीचा अपवाद वगळता कारखान्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी आपले वर्चस्व राखले आहे. सभासदांनी पाच वर्षे नरके घराण्याला बाजूला ठेवत कारखान्याची सत्ता राजर्षी शाहू आघाडीच्या हातात दिली होती; पण पाच वर्षांत पाच अध्यक्षांचा कारभार पाहून सभासदांनी पुन्हा गेली दहा वर्षे नरके घराण्यावरच विश्वास दाखविला आहे. आता आमदार नरके यांच्याविरोधात शाहू आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आघाडीचे नेतृत्व ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, यशवंत बॅँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देसाई व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील हे करीत आहेत; पण ‘कुंभी बचाव मंच’च्या माध्यमातून बाजीराव खाडे यांनी गेली दीड-दोन वर्षे कार्यक्षेत्रात सर्वपक्षीय स्वतंत्र मोट बांधली आहे. जिल्हा बॅँकेचे माजी संचालक संदीप नरके यांनीही ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नारा देत ‘कुंभी’च्या राजकारणात उडी घेतली आहे. त्यांची आतापर्यंतची भूमिका पाहता ते थेट नरके घराण्याविरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता धूसर आहे. (प्रतिनिधी)


दुरंगी लढत होणार
राजर्षी शाहू आघाडी व कुंभी बचाव मंच यांनी स्वतंत्र तयारी केली असली तरी दोन्हीही आघाड्या माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. त्यामुळे विरोधक विस्कळीत वाटत असले तरी शेवटच्या क्षणी एकत्र येऊन ते तगडे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. त्यामुळे नरके पॅनेल व विरोधी आघाडी असाच दुरंगी सामना होण्याची दाट शक्यता आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी बदलणार?
निवडणूक प्राधिकरणाने ‘कुंभी’च्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (नरेगा) विद्युत वरखेडकर यांची नियुक्ती केली आहे; पण गेले महिनाभर महापालिका निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी बदलण्याची शक्यता आहे.


अशा आहेत जागा
गटजागा
गट - १ ३
गट - २४
गट - ३३
गट - ४३
गट - ५३
अनुसूचित जाती१
महिला प्रतिनिधी२
इतर मागासवर्गीय१
भटक्या विमुक्त जाती१


असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची मुदत- २३ ते २७ नोव्हेंबर
दाखल अर्जांची छाननी- ३० नोव्हेंबर
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध- १ डिसेंबर
माघारीची मुदत- १५ डिसेंबरपर्यंत
मतदान- २७ डिसेंबर
मतमोजणी- २९ डिसेंबर

Web Title: Polling for 'Kumbhi' on 27th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.