कोल्हापूर-गगनबावडा रस्ता दुरुस्तीचे सर्वेक्षण सुरू
By Admin | Updated: November 8, 2014 00:24 IST2014-11-08T00:18:04+5:302014-11-08T00:24:53+5:30
‘लोकमत’चा दणका : पाच मीटरचा रस्ता होणार सात मीटरचा

कोल्हापूर-गगनबावडा रस्ता दुरुस्तीचे सर्वेक्षण सुरू
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरश: चाळण होऊन या राज्यमार्गाला पाणंद रस्त्याचे स्वरूप आले होते. यावर ‘लोकमत’मधून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची चाळण अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या रस्त्याचा बांधकाम विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून दुरूस्तीसाठी सर्व्हे झाला असून, या रस्त्याच्या मजबुतीबरोबर रूंदीकरणही होणार आहे.
कोल्हापूर-गगनबावडा रस्ता हा तळकोकणात प्रवेश करण्यासाठी खुश्कीचे प्रवेशद्वार आहे. या मार्गावरूनच तळकोकणात गोवा, रत्नागिरी, विजयदुर्ग, खारेपाटणसारख्या पर्यटन केंद्राकडे जाण्यासाठी सर्वांत जवळचा व सुरक्षित मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. ५४ कि.मी.च्या या मार्गाला २५० नागमोडी वळणे आहेत. मात्र, शासनाच्या दुर्लक्षाने व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने या मार्गावर खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली होती. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, माल वाहतूक करणारी मोठी वाहने, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना कोणता खड्डा चुकवावा, अशी अवस्था निर्माण झाली होती.
मात्र, या मार्गावर करण्यात आलेली दुरूस्तीची व पॅचवर्कची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत ‘लोकमत’मधून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची चाळण असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत बांधकाम विभागाने गेल्या चार दिवसांपासून कळेपर्यंतच्या मार्गाचे पाच मीटरऐवजी सात मीटर रूंदीकरण व दुरूस्ती सर्व्हे सुरु आहे.
- सोयीचा पण कंबरडे मोडणारा /पान ३ वर
रस्ता दुरुस्तीचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये दुरूस्ती व पॅचवर्किंगसाठी खर्च होतात. मात्र दर्जाहीन कामामुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी केलेली कामे उखडून रस्त्याची चाळण झाली आहे. आता होणाऱ्या रस्त्याचा दर्जा राखणे महत्त्वाचे आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष वाचविणे गरजेचे
रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वृक्ष आहेत. या वृक्षामुळे या रस्त्याला निसर्गाच्या सौंदर्याचे लेणे मिळाले आहे. हे वृक्ष वाचविण्याची गरज आहे.कोल्हापूर ते कोपार्डे दरम्यान असणारे वीट भट्ट्या व बांधकाम अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. ते हटविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.