जिल्ह्यातील बारा केंद्रांवर होणार मतदान

By Admin | Updated: November 28, 2015 00:39 IST2015-11-28T00:36:38+5:302015-11-28T00:39:59+5:30

विधानपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

Polling to be held at 12 centers in the district | जिल्ह्यातील बारा केंद्रांवर होणार मतदान

जिल्ह्यातील बारा केंद्रांवर होणार मतदान

कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी २७ डिसेंबरला बारा केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. ३० डिसेंबरला येथील रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाकडील या आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्ष, उमेदवार व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी येथे केले.विधानपरिषद निवडणुक प्रक्रियेचा व आचारसंहितेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणा यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनी बोलत होते. महापालिकचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तहसीलदार, प्रांत यांनी कायदा, सुव्यवस्था विषयक आवश्यक ती दक्षता घ्यावी, व त्या संदर्भातील दैनंदिन अहवाल सादर करावेत. जिल्ह्यातील होर्डिंग्ज, पोस्टर तत्काळ काढण्याची कायर्वाही करावी. मेळावे, शिबिरे घेण्यात येऊ नयेत, कोणत्याही कामाच्या निविदा काढू नयेत, कोणत्याही शासकीय विकास कामाचे उद्घाटन, अनावरण, भूमिपूजन तसेच नवीन धोरणे उद्घोषित करता येणार नाहीत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये धोरणात्मक निधींबाबत निर्णय घेऊ नयेत, लोकप्रतिनिधी किंवा मंत्री महोदय यांनी बोलविलेल्या बैठकांना तसेच कार्यक्रमांना शासकीय यंत्रणांनी उपस्थित राहू नये.
यावेळी आचारसंहितेसंदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे बाळासाहेब खाडे, शिवसेनेचे प्रवीण पालव, बसपाचे अजय कुरणे, मनसेचे विजय करजगार, शेकापचे भाई पी. टी. चौगले, नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे अमित पावले उपस्थित होते. (प्रतिनिधी)


रमणमळा येथे ३० डिसेंबरला मतमोजणी
निवडणुकीसाठी २ डिसेंबरला अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १० डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत १२ डिसेंबर ही आहे. मतदान २७ डिसेंबरला होणार असून, मतमोजणी ३० डिसेंबरला बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे होणार आहे. निवडणुकीसाठी बारा मतदान केंद्रे असून, ३८२ मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच कमर्चारी नियुक्त करण्यात येणार असून, सर्व प्रांताधिकाऱ्यांची झोनल आॅफिसर म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Polling to be held at 12 centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.