तर मराठा आरक्षणाबाबत गावोगावी पोलखोल सभा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:02+5:302021-08-17T04:31:02+5:30
पवार यांनी या आरक्षणाबाबत जनजागृती करण्याचे जाहीर केल्यानंतर पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांना हे प्रत्युत्तर ...

तर मराठा आरक्षणाबाबत गावोगावी पोलखोल सभा घेणार
पवार यांनी या आरक्षणाबाबत जनजागृती करण्याचे जाहीर केल्यानंतर पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांना हे प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.
पाटील म्हणाले की, पवार यांची पत्रकार परिषद पाहून मती गुंग झाली. ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ याचे हे उत्तम उदाहरण आहे. राजकारणामध्ये खऱ्याचा सामना करता येत नसेल तर समाजाला गोंधळात टाकून सोडले जाते. तेच काम पवार आणि अशोक चव्हाण करत आहेत. केंद्र सरकारने आरक्षणाबाबत राज्याला अधिकार दिला; परंतु केंद्रानेच ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती केल्याशिवाय तो कसा अमलात येणार, असे पवार विचारत आहेत. मग गेल्या ५८ वर्षांमध्ये ५० टक्केंच्यावर आरक्षण देण्यासाठी तुमचे हात कोणी बांधले होते. काहीही झाले तरी मराठा मागास आहे, हे सिद्ध केल्याशिवाय कोणताही पर्याय नसताना याच मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. इतर मागासांच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या समितीचा निधीही दिला नसल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.
चौकट
तुम्ही मराठा समाजाला मागास का ठरवले नाही
महाराष्ट्रात तुमचे सरकार असताना याबाबत सहा आयोग नेमले गेले; परंतु त्यांनी मराठा समाज मागास नाही, असा अहवाल दिला. मग तुम्ही हे अहवाल फेटाळले का नाही, अशी विचारणा पाटील यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात हा कायदा टिकवला, त्या आधारे अनेकांना प्रवेश मिळाले, नोकऱ्या मिळाल्या; परंतु तुम्हाला तो सर्वोच्च न्यायालयात टिकवता आला नाही, याचे खापर दुसऱ्यावर फोडू नका, असे ते म्हणाले.
चौकट
फक्त पाच जण मंत्रालयात या
उद्धव ठाकरे यांना जरा मंत्रालयात यायला सांगा, तुम्ही, अशोक चव्हाण, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस येतील. सर्व वाहिन्यांचे कॅमेरे लावा आणि या सर्व मुद्द्यांवर जाहीर चर्चा होऊ दे. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता ते पाहू दे. गावोगावी सभा घ्यायची गरजच नाही, असे आव्हान यावेळी पाटील यांनी दिले.
चौकट