कुरघोडीचे राजकारण उफाळले

By Admin | Updated: February 26, 2015 00:13 IST2015-02-25T22:11:09+5:302015-02-26T00:13:49+5:30

राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण : जांभळे-माने गटाची मुंबईला धाव; राजकीय क्षेत्रात उत्सुकता

The politics of Kurghadi was lifted | कुरघोडीचे राजकारण उफाळले

कुरघोडीचे राजकारण उफाळले

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजी विकोपाला गेली असून, परस्परांवर कुरघोड्यांचे राजकारण उफाळून आले आहे. गटबाजीमुळे पोखरलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस अधिकच क्षीण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीतील जांभळे-माने गटाने पक्षनेतृत्वाकडे धाव घेतली असून याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच गटबाजीचे राजकारण आहे. राजकीय घडामोडी किंवा प्रसंगानुरूप ही गटबाजी डोके वर काढते. मात्र, कालांतराने त्यावर पडदा पडतो. अशा पार्श्वभूमीवर सन २०११ मध्ये नगरपालिकेची झालेली सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्वतंत्ररित्या लढवली. त्यामुळे पालिकेत प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रीय कॉँग्रेस व विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली.
निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १० व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले. सत्ता स्थापन करताना दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येऊन आघाडी केली. सुरूवातीला नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. पक्षप्रतोदपदी रवींद्र माने यांची निवड झाली होती. सन २०१३ मध्ये नितीन जांभळे बांधकाम समितीचे सभापती झाले असताना त्यांचे वडील व स्वीकृत नगरसेवक अशोकराव जांभळे यांनी पालिकेच्या कामकाजात लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यामुळे जांभळे यांचेही आणखीन एक वेगळे सत्ता स्थान नगरपालिकेत निर्माण झाले.
दरम्यान, २०१४ च्या सुरूवातीला प्रभाग क्रमांक ३ मधील कॉँग्रेसचे नगरसेवक जहॉँगीर पटेकरी यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पटेकरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले. आणि त्याठिकाणी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीमध्ये आघाडी असली तरी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात सरळ लढत झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विठ्ठल चोपडे निवडून आले. या निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांना शहर विकास आघाडीने मदत केली. परिणामी निवडून आल्यानंतर विठ्ठल चोपडे शहर विकास आघाडीच्या संगतीत राहिले.
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या पदाची मुदत संपूनसुद्धा त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बंडास शहर विकास आघाडी आणि चोपडे यांच्या बरोबरीने त्यांच्या कारंडे गटाने पाठिंबा दिला. याचा परिणाम म्हणून नगरपालिकेतील कॉँग्रेसच्या आघाडीचे वर्चस्व संपुष्टात आले. नगराध्यक्षा बिरंजे यांना दिलेला कारंडे गटाचा पाठिंबा पक्षप्रतोद माने व जांभळे यांना अस्वस्थ करीत राहिला. चोपडे यांचे पालिकेच्या राजकारणातील वर्चस्व वाढत राहिले. त्यातूनच पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. चोपडे यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी पक्षप्रतोद माने व जांभळे यांनी आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, चोपडे हे पक्ष विरोधी कारवाया करतात. म्हणून त्यांचे तात्पुरते निलंबन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव पारीत करण्यात आला; पण कारंडे गटाने माने-जांभळे गटाच्या कुरघोडीवर मात करीत प्रदेश कार्यकारिणीकडून माने यांच्याच निलंबनाचे आदेश मिळविले. त्याचबरोबर पक्षप्रतोद म्हणून चोपडे यांची निवड झाल्याचे जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केले. तर माने यांचे निलंबन तात्पुरते रद्द ठेवल्याची माहिती राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा निवेदिता माने यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: The politics of Kurghadi was lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.