राजकारणातून विकासकामांना विरोध नको
By Admin | Updated: May 5, 2015 01:17 IST2015-05-05T01:17:08+5:302015-05-05T01:17:08+5:30
प्रवीणसिंह पाटील : मुरगूड शहराला १५ कोटींचा निधी मिळाला

राजकारणातून विकासकामांना विरोध नको
मुरगूड : साडेतीन वर्षांमध्ये तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी मुरगूड नगरपालिकेला मिळाला आहे. सर्वांग सुंदर मुरगूडसाठी विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. ही विकासकामे पाहून विरोधी गटाला पोटशूळ उठले असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या विकासकामांना जर कोणी विरोध करत असेल, तर त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी दिला. शहरासाठी विरोधी गटाने काय केले ते जनतेसमोर आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुरगूड शहरामध्ये सुरू असणाऱ्या विकासकामांबाबत मंडलिक गटाच्या नगरसेवक व काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत ही कामे वेगाने आणि चांगली करावीत, अशा मागणीचे निवेदन नगरपरिषदेला दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वसुधा कुंभार होत्या.
यावेळी पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २ कोटी २५ लाख, नगरोत्थान योजनेंतर्गत ३ कोटी ७० लाख, रस्ता अनुदानातून २ कोटी ५२ लाख, आदी १४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी आणला आहे. यातून जवळजवळ ८० टक्के विकासकामे पूर्ण झाली असून, ही कामे होत असताना जर काय चुकत असेल, तर विरोधी नगरसेवकांनी येऊन सूचना केल्या पाहिजेत, पण उगाचच पत्रकबाजी करून शहराची आणि गटाची बदनामी कदापि खपवून घेतली जाणार नाही.
नगराध्यक्षा वसुधा कुंभार म्हणाल्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच विरोधी गट पत्रकबाजी करत असून, त्याला कोणीही दाद देणार नाहीत. विकासकामांवर बोलावयाचे असल्यास समोरासमोर येऊन आपण बोलू.
यावेळी बजरंग सोनुले, डॉ. सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, रेखा सावर्डेकर, माया चौगले, गौराबाई सोनुले, रवींद्र कांबळे, अॅड. सुधीर सावर्डेकर, दगडू शेणवी, मोहन कांबळे, पृथ्वीराज कदम, आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)