विजयाने अमर पाटील यांचे राजकीय पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:36+5:302021-05-05T04:39:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विजयाने अमर यशवंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. पन्हाळा-शाहूवाडी ...

विजयाने अमर पाटील यांचे राजकीय पुनर्वसन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विजयाने अमर यशवंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाच्या राजकारणात पारंपरिक विरोधक असलेल्या आमदार विनय कोरे यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांना मिळालेला हा दुसरा विजय आहे. विधानसभेच्या मदतीची कोरे यांनी परतफेड केली आहे. अमर पाटील यांना २०२१, तर पी. डी. धुंदरे यांना १५८२ मते मिळाली. पाटील ४३९ मतांनी विजयी झाले.
पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या राजकारणावर तब्बल तीन दशके दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे जबरदस्त राजकीय वर्चस्व राहिले. परंतु, त्यांच्या पराभवानंतर मात्र विनय कोरे यांनी वर्चस्व निर्माण केले. त्यांना नव्या पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून जिंकण्यासाठी शाहूवाडीत मतांचे पाठबळ हवे आणि पन्हाळ्यात मतविभागणी व्हायला नको अशी मोर्चेबांधणी करावी लागते. गेल्या निवडणुकीत त्यांनी तसे नियोजन केले. त्याच नियोजनाचा भाग म्हणून आमदार कोरे यांनी शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना व पन्हाळ्यातून अमर पाटील यांना गोकुळची उमेदवारी विरोधी आघाडीतून मिळवून दिली. त्यामुळे अमर पाटील यांना गोकुळमधील सत्तेची संधी मिळाली.
अमर पाटील यापूर्वी तीन वेळा जिल्हा परिषदेला विजयी झाले आहेत. शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विधानसभेची २०१४ ची निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढविली होती; परंतु तिथे त्यांना मोठे अपयश आले. त्यानंतर त्यांनी कोरे गटाशी जुळवून घेतले. त्याचा पहिला फायदा त्यांना कोडोली ग्रामपंचायत सत्तेत झाला. गोकुळच्या निवडणुकीत खरेतर विरोधी आघाडीतून विश्वास नारायण पाटील हे या इतर मागासवर्ग गटातून निवडणूक लढविणार होते. परंतु, तुम्ही विरोधी आघाडीचे प्रमुख असताना राखीव गटातून निवडणूक लढवली तर चुकीचा मेसेज जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांना वाटल्याने त्यांनी या जागेवर अमर पाटील यांचे नाव पुढे आणले. सत्तारूढ आघाडीतील विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे यांच्याबद्दल नाराजी होती. त्यांचा फारसा संपर्क नव्हता. आमदार पी. एन. पाटील गटाचे ते मानले जातात. कोरे व सतेज पाटील यांचे पाठबळ व अमर पाटील यांनी विविध माध्यमांतून लावलेल्या जोडण्या त्यांना यश देऊन गेले.