‘हाणामारी प्रकरणातील दोन्ही पोलिस निलंबित’
By Admin | Updated: January 19, 2017 01:03 IST2017-01-19T01:03:18+5:302017-01-19T01:03:18+5:30
विशेष क्राईम ब्रँचची नियुक्ती -संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

‘हाणामारी प्रकरणातील दोन्ही पोलिस निलंबित’
सांगली/कोल्हापूर : पोलिस दलात अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी हाणामारी करणारे
पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, या दोन पोलिसांवर बडतर्फीबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी सुरू असून, ‘मोक्का’अंतर्गतही कारवाईची टांगती तलवार आहे. मोटार पेटविल्याच्या
मोटार पेटविल्याच्या संशयावरून सांगली शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस शिपाई संतोष पाटील व किरण पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. राज्यातील संपूर्ण पोलिस दलात अशाप्रकारे पोलिसांच्यात अंतर्गत कुरघोड्या, वादावादीची खदखद आहे. यासंबंधी आपण काय भूमिका घेणार आहात? या प्रश्नावर नांगरे-पाटील म्हणाले, दोन पोलिसांच्या वादाची ठिणगी भडकून सांगली पोलिस दलातील गटबाजीचे दर्शन झाले, हे खेदजनक आहे. जनतेचे संरक्षण करणारेच हातामध्ये तलवारी घेत असतील, तर गंभीर आहे. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्यांना कायदा माहीत असतो. त्यांनी कायद्याने तक्रार द्यायची सोडून थेट हाणामारी करून पोलिस खात्याची बदनामी केली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खात्यात ठेवणे घातक आहे. संबंधित प्रकरणाची मी स्वत: माहिती घेतली आहे. सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी सांगलीत पत्रकारांशी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, या दोन पोलिसांनी मारामारीसाठी गुंडांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही गटांतील साथीदारांचे पोलिस रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आल्यास दोन्ही गटांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच या दोन्ही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
विशेष क्राईम ब्रँचची नियुक्ती
परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये अंतर्गत वादावादी असल्याचे लक्षात आले आहे. ही खदखद कोणाकोणांत आहे, अवैध व्यावसायिक, गुन्हेगारांशी कोणाचे लागेबांधे आहेत, याचा गोपनीय तपास करण्यासाठी ‘विशेष क्राईम ब्रॅँच’ची नियुक्ती केली आहे. हे पथक या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेईल. त्यानंतर एक-एक दोषी अधिकारी अथवा कर्मचारी खड्यासारखे शोधून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल.
‘एसीपी’ दरबार : पोलिस दलात काम करताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल, कोणी कर्मचारी वरिष्ठांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल, कार्यालयीन कामकाजासंबंधी काही अडचणी असतील, तर असे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘एसीपी’ दरबार भरविणार आहे.
संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी
जयसिंगपूर : हाणामारी प्रकरणातील पाच संशयित आरोपींना बुधवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कॉन्स्टेबल संतोष हरी पाटील (वय ३३, रा.अब्दुललाट, ता. शिरोळ), सचिन विजय डोंगरे (२५, रा. शंभरफुटी रोड गुलाब कॉलनी सांगली), दत्तात्रय शामराव झांबरे (२०, रा. भोसे, ता. मिरज, जि. सांगली), स्वप्निल ऊर्फ गोट्या प्रकाश कोलप (२५, रा. अंकली, ता. मिरज) व महेश शिवाप्पा नाईक (२५, रा. शंभर फुटी रोड, गुलाब कॉलनी सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, यातील संशयित आरोपी अरुण हातळगे याच्यावर मिरज मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम करीत आहेत.